शिष्य : गुरुजी, सध्या बेळगाव, चिकोडी मतदार संघात वातावरण कसे आहे पाहिले का? एका बाजूला तरुण तुर्क आणि एका बाजूला म्हातारे अर्क! अशा पद्धतीच्या लढती सुरु आहेत.
गुरुजी : तुला काय म्हणायचं आहे वत्सा?
शिष्य : काँग्रेसने तरुण रक्ताला वाव दिलाय, त्याचठिकाणी भाजप जे तरुणाईला नेहमी वाव देतं, त्यांनी जुन्या पिढीतील दोन उमेदवारांना संधी दिली आहे. हे कसं काय गुरुजी?
गुरुजी : जी संस्कृती पूर्वी काँग्रेसमध्ये होती ती आता भाजपमध्ये सुरु झाली आहे. कारण काँग्रेसचे बहुतांशी नेते आता भाजपमध्ये डेरेदाखल झालेले आहेत. काँग्रेस ज्या पद्धतीने जात होता, त्या पद्धतीने आता भाजपाची रणनीती तयार होत आहे.
शिष्य : गुरुजी, केंद्रीय नेते तर म्हणत आहेत, कि आता आम्ही जुन्या नेत्यांना बाजूला सारून नवीन तरुण रक्ताला वाव देणार आहे.
गुरुजी : या सगळ्या बोलाच्याच कढया आणि बोलाचेच भात! कारण केंद्रातच जे वरिष्ठ म्हणून बसले आहेत, त्यांचेच वय आता सत्तरीच्या आसपास आहे. तर त्यांनी कोणत्या तोंडाने खालच्या लोकांना सांगणार कि आता तुम्ही बाजूला व्हा आणि नव्या रक्ताला वाव द्या…
शिष्य : मग ‘सब घोडे बारा टक्के’! असंच म्हणणं आहे का तुमचं?
गुरुजी : तसं म्हणता येईल… पण एक बाब लक्षात घे, कि यात मुख्यतः देशभर एक बाब पाहिली, तर भाजपने होलसेलमध्ये काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आपल्यात सामावून घेतले. आणि आता त्यांची हीच अडचण होत आहे, कि जुने नेते जे घेतले आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांना उमेदवारी तर दिली पाहिजेत. त्यांना प्रत्येक पद दिलं पाहिजे. आणि जे सतरंज्या, खुर्च्या उचलणारे होते ते मात्र कार्यकर्ते ते कार्यकर्तेच राहिले!
शिष्य : गुरुजी मग भाजपाची काँग्रेस झाली असं म्हणाल का?
गुरुजी : अरे भाजपाची भाजप राहिलेच कुठं? सगळे काँग्रेसचेच लोक तर तिथं पदाधिकारी होऊन बसले आहेत, मंत्री झाले आहेत. ‘आयाराम’ना सगळ्यांनाच उच्चासनावर बसवलं जात आहे. आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते मात्र टाळ्या वाजवण्यासाठी खाली सतरंजीवर बसलेत!
शिष्य : मग गुरुजी भाजपचे पण अशा धोरणामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत काही खरं दिसत नाही.
गुरुजी : अरे शिष्या , एखाद्या घटनेवरून, त वरून लगेच ताकभात असे समीकरण कसे काय बंधू शकतोस? यावेळी भाजपाला निश्चितच जागा कमी मिळतील, त्यांचे उमेदवार कमी प्रमाणात निवडून येतील.. पण सत्तेचं सोपान कुणाकडे येईल हे अजून निश्चित सांगता येत नाही.
शिष्य : गुरुजी तरीही तुमचा अंदाज काय आहे?
गुरुजी : मला वाटतंय भाजपाची थोडी सरशी होईल. पण म्हणावे तितके जबरदस्त मताधिक्य मिळेल, असे काही वाटत नाही.
शिष्य : मग गुरुजी बेळगाव आणि चिकोडी बद्दल तुमचं मत काय?
गुरुजी : मी नेहमीप्रमाणे सांगताच आलो आहे. इथं मात्र साठमारी सुरूच आहे. दोन दिग्गज मंत्र्यांमध्ये मात्र जोरदार खेचाखेची सुरु आहे. यात कोण सरशी मारेल त्याचा उमेदवार सरस ठरणार असे दिसत आहे.
शिष्य : गुरुजी निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या उमेदवाराकडून मराठीमध्ये भाषणे, मराठीमध्ये प्रचार सुरु आहे. ऐन निवडणुकीत भगवा घेऊन काँग्रेसचा उमेदवार प्रचार करतो आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे. जगदीश शेट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुवर्णसौध बांधली, मराठी भाषिकांना डिवचलं, मराठी भाषिकांच्या विरोधात वक्तव्ये केली, हे मराठी भाषिकांकडे मत मागण्यासाठी कसे काय जातात?
गुरुजी : हे निवडणुकीपुरतेच फंडे असतात! हे मतदारांना भुलवण्यासाठी अनेक आश्वासने दिली जातात. खरं म्हणजे हे खरे नटरंग आहेत. चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे ओढून जनतेसमोर वेगवेगळे खेळ करणारे हे लोकशाहीच्या मंदिरातील खरे नट आहेत. त्यांनी अनेकवेळा मराठी भाषिकांना वेगवेगळे रंग दाखवून आजपर्यंत झुलवत ठेवलं! आश्वासनांची खैरात केली. पण मराठी भाषिकांचे कोणतेही मत शेवट्पर्यंत त्यांनी ऐकले नाही. निवडणुका सरल्या कि परत त्यांचा अजेंडा वर येतो. मराठी भाषिकांवर अत्याचाराच्या फैरी झाडल्या जातात. असे दरवेळी घडत आले आहे.
शिष्य : गुरुजी आता मराठी भाषिकांनी समितीला मतदान करणं कितपत महत्वाचे आहे? एकीकडे काँग्रेसचे राहुल गांधी तर दुसरीकडे भाजपचे नरेंद्र मोदी! यांना दाखविण्यासाठी बेळगावमध्ये राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषिकांनी का मते घालावीत?
गुरुजी : मराठी भाषिकांनी स्वतःची ताकद दाखविण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे. मराठी माणसाची ताकद किती आहे? मराठी माणूस किती प्रमाणात या परिसरात आहे याची नोंद करायची असेल, तर निश्चितच मराठी भाषिकांनी एकगठ्ठा मतदान समितीच्या पाठीशी उभं राहून करणे गरजेचे आहे. मराठी माणसाने आपापली दुही विसरून आपण मराठी आहे, मायमराठीचे सुपुत्र आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपली भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तरच आपलं मराठीपण टिकणार आहे. आपलं मराठीपण टिकवायचं असेल तर मराठी माणसाने एकत्रित येऊन समितीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
शिष्य : गुरुजी, तूर्तास ठीक आहे. पुन्हा बोलूया…