बेळगाव लाईव्ह :: महाराष्ट्र एकीकरण समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज चंद्रकांत कोंडुसकर यांनी समितीच्या निवड कमिटीकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केला आहे. आतापर्यंत तीन उमेदवारांनी समितीकडे इच्छुक म्हणून अर्ज सादर केले असून ९ एप्रिल पर्यंत समितीकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
साधना सागर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील या दोन इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आता समिती कार्यकर्ते चंद्रकांत कोंडुसकर यांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केला असून या तिन्ही उमेदवारांमधून समितीमधून कोणाला संधी देण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आज समिती कार्यकर्त्यांसह चंद्रकांत कोंडुसकर यांनी जत्तीमठ देवस्थानापासून रंगुबाई पॅलेस येथील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयापर्यंत पायी चालत येऊन अर्ज सादर केला. मराठी भाषिक, मराठी भाषेवर होणारे अत्याचार, याचप्रमाणे मराठी फलकांना लक्ष्य करून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न, कन्नडसक्ती, रोजगाराची समस्या, अल्पभूधारक शेतकरी, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या यासारख्या अनेक समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी समिती आपला उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवत आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येयधोरणाशी बांधील राहत, मराठी भाषिकांसाठी शेवट्पर्यंत लढेन, असा शब्द देत चंद्रकांत कोंडुसकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांनी व्यक्तीपेक्षाही समिती म्हणून मतदान करून आपले मराठीपण अधोरेखित करावे, असे आवाहन मराठी भाषिकांना केले.
यावेळी बोलताना गुणवंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती हि केवळ मराठी भाषिकांच्या हितासाठी लढा देणारी संघटना आहे. सीमाभागात मराठी भाषिकांना लक्ष्य करून अनेक अन्याय, अत्याचार केले जातात. याला विरोध करण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचा टक्का मतदानाच्या माध्यमातून दर्शवून देण्यासाठी निवडणूक लढविली जाते. राष्ट्रीय पक्षांचे धोरण हे आजवर प्रत्येकाने पाहिले आहे. मात्र समितीमध्ये कार्यकर्त्याला अधिक महत्व आहे.
यासाठीच सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्याची संधी आजवर देण्यात आली आहे. निवडणूक लढविणारा समितीचा चेहरा हा व्यक्ती नसून समितीचेच स्वरूप आहे, हे जाणून प्रत्येक मराठी भाषिकाने समितीसाठी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.