Sunday, January 26, 2025

/

भाजपमधील अंतर्गत वैराचा होईल निवडणुकीनंतर स्फोट -सवदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भारतीय जनता पक्षामधील वाढत चाललेले अंतर्गत वैर, असंतोष परीसीमा गाठत असून लोकसभा निवडणूक होताच त्याचा स्फोट होईल, असे भाकीत गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकेकाळचे भाजपचे कट्टर नेते आणि आरएसएसचे निकटवर्तीय माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.

एका विस्तृत मुलाखतीमध्ये बोलताना चिक्कोडीमध्ये झंजावाती प्रचार दौऱ्यावर असलेले सवदी म्हणाले की, तुम्हाला माहीतच असेल की भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत भांडणं सुरू आहेत. भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांचा शिमोगा मतदार संघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढाविण्याचा मुख्य हेतू भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे चिरंजीव राघवेंद्र यांना पराभूत करणे हा आहे.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि येडियुरप्पा यांच्या सांगण्यावरून हुबळीमध्ये भाजपचे प्रल्हाद जोशी यांचा पराभव करण्याच्या एकमेव उद्देशाने डिंगलेश्वर स्वामी (स्वतंत्र) निवडणूक लढवत आहेत. जोशी यांच्या विरुद्ध डिंगलेश्वर स्वामी यांना उभे करण्यास संपूर्णपणे शेट्टर आणि येडियुरप्पा जबाबदार आहेत. भाजपमधील अंतर्गत वैर झपाट्याने पसरत आहे असे सांगून आगामी निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मंत्री व्ही. सोमन्ना यांचाही पराभव होईल असे प्रयत्न या भगव्या पक्षांतर्गत सुरू असल्याचे लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.

 belgaum

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राज्यातील परिस्थिती आणि लोकांची नाडी पाहता काँग्रेसचा वरचष्मा निश्चित आहे. अधिक तर उत्तर कर्नाटकातील जागांसह राज्यातील 28 पैकी किमान 20 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. उत्तर कर्नाटकातील बिदर, कलबुर्गी, रायचूर, विजयपुरा, बागलकोट, बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार मतदार संघातील विजयासाठी काँग्रेस सज्ज आहे. या निवडणुकीत भाजप बऱ्याच जागा गमवेल. त्यांनी प्रथम शिमोगा मधील जागा जिंकावी, असे सवदी पुढे म्हणाले.

यावेळेस काँग्रेसला जास्त जागा जिंकण्याची अधिक शक्यता का वाटते? यावर बोलताना सवदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षापासून केंद्रात असलेल्या भाजप सरकारच्या अपयशामुळे लोक नाराज आहेत. त्याच वेळी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे लोक प्रभावित आहेत. हमींमुळे (गॅरंटी) सर्वसामान्य जनता खूश आहे.

राज्यातील सुमारे 80 ते 85 टक्के महिला हमी योजनांवर खूश होऊन काँग्रेसला मतदान करण्यास तयार आहेत. येथे निवडणुकीत मोदी फॅक्टर भाजपला मदत करेल का? या प्रश्नाला उत्तर देताना भाजप केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वीची आणि आजची सध्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. भाजपच्या नेतृत्वाने म्हंटले आहे की ते तथाकथित गुजरात मॉडेलचा संपूर्ण देशात विस्तार करेल. सत्तेत येण्यासाठी भाजपने अनेक गोष्टी लोकांच्या मनात रुजवल्या. भारतातील नद्या जोडण्याचे आश्वासन, परदेशातील बँकांमधून काळा पैसा परत आणणे, प्रत्येक बँक खात्यात 15 लाख रु. जमा करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आदी आश्वासने दिली.

मात्र त्यांची पूर्तता करण्यात त्यांना अपयश आले आहे. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी चक्रवर्ती सुलिबेले जोरदार प्रचारात होते. एकदा का मोदी सरकारने काळा पैसा भारतात परत आणला तर देशभरातील रस्त्यांना सोन्याचा मुलामा लागेल. तसेच जपान आणि चीन प्रमाणे भारतामध्ये बुलेट ट्रेन धावतील. ज्यामुळे दिल्लीहून बेळगावला अवघ्या दोन तासात पोहोचता येईल असे ते म्हणाले होते. डॉलरचा दर भारतीय रुपयांपेक्षा कमी होईल असा दावा करण्याबरोबरच त्यांनी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाईल, असे म्हंटले होते. मात्र गेल्या 10 वर्षात भाजपने आपल्या एकाही वचनाची पूर्तता केलेली नाही असे सांगून राज्यात काँग्रेस आपले 20 जागांचे उद्दिष्ट गाठेल अशी मला आशा आहे, असे लक्ष्मण सवदी म्हणाले.

राज्याच्या राजकीय भविष्याबद्दल बोलताना लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश मिळण्याची आशा असल्याचे संकेत सवदी यांनी दिले.

शेट्टर यांनी भाजपमध्ये परतण्याचा घाईघाईत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थोडा संयम बाळगण्याची गरज असल्याचे सवदिंनी सांगितले. मी अलीकडेच काँग्रेसमध्ये सामील झालो आणि इतक्यातच मी फार अपेक्षा बाळगण्याची गरज नाही. पगारावर हक्क सांगण्यापूर्वी तुम्ही तुम्हाला दिलेले काम पूर्ण केले पाहिजे, अन्यथा काम न करता तुम्हाला कोण पगार देईल? असे सवदी शेवटी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.