बेळगाव लाईव्ह : अवघ्या १६ दिवसात चक्क १७०० किलोमीटरचा प्रवास सायकलीवरून पार करत बेळगावच्या युवकाने निस्सीम रामभक्तीचे दर्शन घडविले आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावचा कार्यकर्ता किशन टक्केकर या युवकाने बेळगाव ते अयोध्या प्रवास सायकलवरून पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अयोध्येमध्ये रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच्या पहिल्या रामनवमीचा उत्सव आज भव्य प्रमाणात साजरा केला जात असताना या पार्श्वभूमीवर किशन टक्केकर या युवकाने सायकलवरून अयोध्या गाठली आहे.
आजवर महाराष्ट्रातील अनेक रामभक्तांनी अयोध्या प्रवासासाठी पायी तसेच सायकलवरून जाण्याचा उपक्रम केला असून बेळगावमधून सायकलीवरून प्रवास करून अयोध्येत पोहोचणार हा पहिलाच युवक आहे.
विराट गल्ली, येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा युवा कार्यकर्ता किसन टक्केकर याने नुकताच बेळगाव ते अयोध्या असा सायकल प्रवास पूर्ण केला असून येळ्ळूर येथून अयोध्येला प्रभू श्रीरामांचे दर्शनासाठी सायकलवरून गेलेल्या किसन याने आपला हा 1700 कि.मी. अंतराचा प्रवास श्री चांगळेश्वरी देवीच्या आशीर्वादाने 16 दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
अथक सायकल चालवत अयोध्येमध्ये पोहोचताच किसन टक्केकर याने एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण सुखरूप पोहोचल्याचे कळविले असून त्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.