बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सरासरी तापमानात उच्चांकी वाढ झाली असून उन्हाच्या झळा असह्य होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उच्चांकी तापमानामुळे घराबाहेर पडणे असह्य झाले आहे. शनिवारी ३८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने बाजारपेठेत देखील गर्दी कमी दिसून येत आहे. तर उन्हापासून बचावासाठी पंखे, कुलर, एसी च्या खरेदीतही वाढ होत आहे.
कामानिमित्ताने तसेच लग्नसराई, यात्रा, सण-समारंभाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून छत्री, स्कार्फ, गॉगल चा वापर केला जात आहे. कोल्ड्रिंक्स हाऊस, आईस्क्रीम पार्लर, रसवंती गृहात गर्दी वाढल्याचेही चित्र आहे.
उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिकांनी कामाव्यतिरिक्त उन्हामध्ये जाणे टाळावे, शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही
याची दक्षता घ्यावी व उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, पुरेसे पाणी प्यावे, फळाहार किंवा फळांचा रस पालेभाज्या, सॅलड घ्यावे, ताक, उसाचा रस याचा आहारात उपयोग करावा, सैल व सुती कपडे वापरावेत असा सल्ला देण्यात येत आहे.