बेळगाव लाईव्ह:बेळगाव ग्रामीण मधील माजी आमदार संजय पाटील आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला असून लोकसभा निवडणुकीत वेगळा रंग आला आहे.
हिंडलगा येथे आज भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात टीका करताना बेळगाव ग्रामीण मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणे महिला एकत्र आल्या आहेत.
त्यामुळे मंत्री हेबाळकर यांना धडकी भरली असून त्यांना रात्री झोप लागणार नाही. माजी मंत्री रमेश जारकी होळी आज आमच्या व्यासपीठावर असल्यामुळे त्यांना एक पेग जास्तीच घ्यावा लागणार अशा शब्दात टीका केली होती.
या वादग्रस्त टीकेवर मंत्री हेबाळकर यांनी सोशल मीडियावर म्हणणे व्यक्त केले आहे. संजय पाटील यांनी केवळ माझा अपमान केला नाही तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्या व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि विद्यमान खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या त्यामुळे त्यांनी हा प्रकार रोखणे आवश्यक होते पण ते सुद्धा या टीकेला हसून दाद देत होते. यातून भाजपची मानसिकता समोर येत असून लोक मतदानातून त्यांना चोख प्रत्युत्तर देतील, असा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीसाठी नुकताच अर्ज भरणा सुरू झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हे राजकारण कोणते वळण घेते यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.
बेळगाव ग्रामीणचे आमदार आणि राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विरुद्ध माजी आमदार संजय पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य जुनेच आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हे समोर आले आहे.
माजी आमदार संजय पाटील यांनी जरी राजकीय टीका म्हणून केली असली तरी हेब्बाळकर याच मुद्द्यावरून आगामी दिवसात राजकारण पेटवू शकतात राज्यस्तरावर हा मुद्दा बनवू शकतात आणि सहानुभूती मिळू शकतात असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणता रंग पाहायला मिळतो हे बघणे महत्त्वाचे आहे.