बेळगाव लाईव्ह : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आजतागायत आम्हा मराठी भाषिकांना पायदळीच तुडविले आहे. म. ए. समितीच्या उमेदवाराला विजयी करून त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असे परखड मत समिती नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
उचगाव (ता. जि .बेळगाव) येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा निवडणूक रिंगणातील उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराप्रसंगी ते ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलत होते.
लोकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच का मतदान करावे? या प्रश्नाला उत्तर देताना आर. एम. चौगुले म्हणाले की, गेली 67 वर्षे प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्यातील सरकारांकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर केला जाणारा अन्याय आता असहनशील होत आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आजतागायत आम्हा मराठी भाषिकांना पायदळीच तुडविले आहे. त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला आपली मायबोली मराठी टिकवायची असेल तर सीमाभागात मराठी भाषेचे रक्षण व संवर्धन करणारी महाराष्ट्र एकीकरण समिती हाच त्यावर जालीम उपाय आहे.
ते पुढे म्हणाले, अलीकडे केंद्र व राज्य सरकारकडून बेळगावचा रिंग रोड, हलगा -मच्छे बायपास रस्ता अशा विकास प्रकल्पांच्या नावाखाली सुपीक शेत जमिनी हडप करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तेंव्हा मराठी भाषिकांसह शेतकऱ्यांचे संरक्षण करायचे असेल तर समस्त मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला विजयी केले पाहिजे. बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी दिलेला महादेव पाटील हा उमेदवार गेली 51 वर्षे समितीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांना सर्वांनी बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन आर. एम. चौगुले यांनी केले.