बेळगाव लाईव्ह : शहर परिसरात वळिवाचे आगमन झाले असून गेल्या आठवड्याभरात वळिवाने ठिकठिकाणी कमीजास्ती प्रमाणात हजेरी लावली. शुक्रवारी पुन्हा जोरदार वारा, तुरळक गारपिटीसह मोठ्या सरींनी हजेरी लावली.
आज झालेल्या पावसाने स्मार्ट सिटी अंतर्गत निर्माण झालेल्या रस्त्यांची पोलखोल झाली असून पहिल्याच पावसाने रस्त्यांची चाळण उडाली आहे. शहरातील पांगुळ गल्ली, भोई गल्ली, गणपत गल्ली, ओल्ड पी. बी. रोड, येडियुरप्पा मार्ग, उद्यमबाग, खानापूर, कॅम्प, फोर्ट रोड, जुना धारवाड रोड आदी ठिकाणी रस्त्यांची पहिल्याच पावसात झालेली दैना, गटारी तुडुंब भरून रस्त्यावर वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी असे ‘स्मार्ट सिटी’चे वाभाडे आज बेळगावकरांना पाहायला मिळाले.
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यापासून आजतागायत विकासकामांच्या निकृष्ठतेबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. असे असूनही बेळगाव स्मार्ट सिटीला पुरस्कार देण्यात आला हि बाब हास्यास्पद आहे.
बेळगाव शहराचा वरवर करण्यात आलेला घोकंपट्टी विकास, स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोचपावती देत आहे. आज बेळगाव शहर आणि परिसरात वळिवाने जोरदार हजेरी लावल्याने स्मार्ट सिटीचे पितळ आणखी एकदा उघडे पडले आहे.
शहरातील कॅम्प परिसरात वळिवाच्या पहिल्याच पावसात रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असून हा रस्ता धोकादायक बनला आहे. कॅम्प मधील हाय स्ट्रीट येथे रस्ता खचल्याने खड्डा पडला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याची पाईप घालण्यासाठी एल अँड टी कंपनीने रस्त्याची खोदाई केली होती.
काही दिवसापूर्वी पाईप घातल्यावर खोदाई केलेल्या ठिकाणी माती घालून डांबरीकरण देखील करण्यात आले होते. परंतु या रस्त्यावरून ट्रक गेल्यामुळे हा रस्ता खचला असून खबरदारी म्हणून येथील व्यापाऱ्यांनी रस्त्यात फलक उभे केले आहेत. एल अँड टी कंपनीने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी तेथील व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.
जुन्या धारवाड रोडवरील गटारी तुडुंब भरून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहात आहे. ओल्ड पी बी रोडवर ब्रिजचे नियोजन नसल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहून आले आहे. तर शहरातील पांगुळ गल्ली, भोई गल्ली येथील गटारी तुडुंब भरल्याने गणपत गल्लीतून मारुती गल्लीच्या दिशेने रस्त्यावरून गटारीचे पाणी वाहत आहे.
बेळगावमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाज करण्यात आले आहे त्या प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचेच काम झाल्याचे उघड झाले असून स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकासकामांचा दर्जा तपासून या योजनेसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.