बेळगाव लाईव्ह : सध्या निवडणुकीचे वारे हळूहळू जोर पकडू लागले आहेत. राष्ट्रीय पक्षांचे नेते कार्यकर्ते शोधत आहेत. एकसंघ कार्यकर्ते मिळण्याचे ठिकाण म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती! आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भुलविण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून सुरु झाले आहे. समितीच्या नेत्यांच्या बाबतीत जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम राष्ट्रीय पक्ष मन लावून करत आहेत. कारण त्यांच्याकडचे उमेदवार हे त्या दृष्टिकोनातून कमकुवत आहेत. एक उमेदवार घराणेशाहीतून आला आहे तर दुसरा उमेदवार उपरा आहे.
एक उमेदवार पंतप्रधानांचे नाव सांगून मतयाचना करत आहे तर दुसरा आपल्या आईने केलेल्या कर्तृत्वाचा पाढा वाचून मतयाचना करत आहे. अशावेळी स्थानिक मराठी भाषिकांनी भूमिपुत्र म्हणून आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाताना कार्यकर्ते घेऊनच जात आहेत. त्यांच्याकडच्या रोडावलेल्या कार्यकर्त्यांची संख्या आणि समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराचीही सुरुवात अजून न होता केवळ गाठीभेटी घेत असताना आणि काही ठिकाणी देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असता सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती पाहता राष्ट्रीय पक्षांना समितीचा दुःसह वाटू लागला आहे. आणि त्या धक्क्यातून समितीविषयी संभ्रम पसरविणे, समितीच्या कार्यकर्त्यांना प्रलोभने दाखविणे, समितीच्या कट्टर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दुही माजविण्याचा प्रयत्न करणे, अशा पद्धतीच्या कुटील रणनीती आखण्याचे प्रयत्न राष्ट्रीय पक्षांकडून सुरु आहेत. परंतु या राष्ट्रीय पक्षांना आजवर कधीही भीक न घालणारे समितीचे कट्टर कार्यकर्ते आताही समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत.
समितीचा उमेदवार हा केवळ एक व्यक्ती नसून हा समिती स्वतः लढविले अशी भावना समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठी माणसामध्ये नेहमी पसरत असल्यामुळे यावेळीही समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी असलेले संख्याबळ हळूहळू वाढत चालले आहे. अजूनही समितीचे कार्यकर्ते घराबाहेर पडलेले नाहीत. तर समितीला इतका प्रतिसाद मिळतो आहे यामुळे निकालाची शक्यता वेगळ्या पद्धतीने निर्माण होत चालली आहे.
अशाप्रसंगी ज्यावेळी निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळी राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकलेली असते. आणि त्या परिस्थितीत हे सर्व राष्ट्रीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते काहीशा गोंधळात सापडलेले दिसत आहेत. राष्ट्रीय पक्षाकडे साधने आहेत. पैसा आणि यंत्रणा आहे तरीही समितीचा एकसंघ कार्यकर्ता हि समितीची संपत्ती आहे आणि या जीवावर समिती पुन्हा एकदा चमत्कार घडवून दाखवेल यात शंकाच नाही.
शनिवारी सायंकाळी बेळगाव शहरातील शिवाजीनगर आणि जुने गांधीनगर भागात उमेदवार महादेव पाटील यांनी मराठी भाषिकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळी मराठी भाषिक एक संघ होतेच याशिवाय चांगला प्रतिसाद देखील मिळाला त्यामुळे हळूहळू महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिक एकवटत आहेत आणि सावकाश का असेना वनवा पेट घेत आहे!