Friday, November 15, 2024

/

सीमावासीयांसाठी लोकसभेची लढाई हि केवळ स्वाभिमान आणि अस्तित्वाचाच!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात गेल्या ६७ वर्षांपासून खितपत पडलेल्या सीमावासियांच्या आशांना पुन्हा एकदा नवचैतन्य प्राप्त होत आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सीमावासीयांसाठी दाखविलेली बांधिलकी, सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारशी सुरु केलेली बातचीत, गतिमान झालेल्या हालचाली, आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र एकीकरण समितीने एकापाठोपाठ एक असे सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय यामुळे लवकरच सीमावासीयांची न्याय्य्य मागणी पूर्ण होणार आणि सीमावासीयांचे स्वप्न साकार होणार अशी चिन्हे दिसत आहेत.

सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीने आजवर सत्ता, पैसा, राजकारण यासाठी कधीच कोणत्याच निवडणुका लढविल्या नाहीत. सीमाभागावर असलेले मराठी भाषिकांचे वर्चस्व अधोरेखित करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नेतृत्व मिळावे, हक्काचा लोकप्रतिनिधी मिळावा यासाठीच आजवर निवडणुका लढविल्या.

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावसह कारवारमध्येही निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. बेळगावमधून महादेव पाटील आणि कारवार मधून निरंजन सरदेसाई अशा दोन सर्वसामान्य उमेदवारांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा समितीच्या जुन्या ढाच्यानुसार कार्य करण्यास सुरुवात केली आहे. समितीला पडलेले खिंडार बुजवून आता केवळ सीमाप्रश्नाची सोडवणूक हाच एकमेव ध्यास मनी ठेवून समितीने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी मतदारांचे विभाजन करण्यासाठी कर्नाटक सरकारने जरी मतदार संघ फोडले असले तरीही समितीच्या उमेदवारांना मिळणारा पाठिंबा हा उल्लेखनीय आहे. शिवाय समिती उमेदवारांना मिळत असणाऱ्या पाठिंब्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, हे मागीलवेळी झालेल्या पोटनिवडणुकीत अधोरेखित झाले आहे.

बेळगावमध्ये बहुसंख्येने मराठी भाषिक आहेतच. मात्र मतदार संघ पुनर्रर्रचनेमुळे विभागल्या गेलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात देखील मराठी भाषिकांचा मिळणारा पाठिंबा अवर्णनीय आहे. कारवार जागेवर समितीचे माजी आमदार निळकंठ सरदेसाई यांचे पुतणे आणि खानापूर तालुका एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निरंजन सरदेसाई यांनी प्रचाराची धुमधडाक्यात सुरुवात केल्यानंतर त्यांना दिवसागणिक मतदारांचा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात असलेल्या ४ लाख मराठी भाषिकांच्या मतांवर देशाच्या सर्वोच्च सभागृहात मराठी भाषिकांच्या व्यथा मांडता येतील, असा विश्वास निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची विजयाच्या दिशेने घोडदौड होत नसली तरीही समिती उमेदवाराला मिळणाऱ्या मतांमुळे राष्ट्रीय पक्षांच्या मतांच्या गणितावर मोठा फरक पडू शकतो हे निश्चित आहे. समिती उमेदवाराला मतांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळेच सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्व अधोरेखित होण्यास मदत होणार हे निश्चित आहे. समितीची सूत्रे तिसऱ्या पिढीकडे गेल्यामुळे उत्तर कर्नाटकात देखील मराठी भाषिकांचा आवाज पुन्हा घुमणार आणि राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना हे कडवे आव्हान ठरणार हे निश्चित आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.