सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण?
पिका आले परी केले पाहिजे जतन
सोंकरी सोंकरी विसावा तोवरी ! नको खाऊ उभे आहे तों
गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें
पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि
खळे दानें विश्व सुखी करी होता रासी
तुका म्हणे मग नाही आपुले कारण
शेतकऱ्याला सदैव जागरूक राहण्याचा, नित्य सावध राहण्याचा सल्ला देणारा संत तुकारामांचा हा अभंग…. शेतकऱ्यांचे जीवनमान हे नेहमीच खडतर असते. हीच बाब हेरून संत तुकारामांनी देखील शेतकऱ्यांवर अनेक अभंग लिहिले. तुकाराम महाराजांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शेती आणि शेतकऱ्यांवरील बालंट आजदेखील जशास तसेच आहे, याची प्रचिती बेळगावमध्ये सुरु असलेल्या रिंगरोड, बायपासविरोधात झगडणाऱ्या शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर येते.
गेल्या काही महिन्यांपासून हलगा – मच्छे बायपासचा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांचा प्रशासन, प्राधिकरणाविरोधात एल्गार सुरु आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती असूनही दडपशाहीचे अस्त्र उगारून याठिकाणी काम सुरूच आहे.
गेल्या आठवड्याभरात पुन्हा बायपासचे कामकाज सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध झुगारून सदर कामकाज सुरूच ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनीही आपल्या भूमिकेपासून मागे न हटता आपला विरोध कायम ठेवला. आणि हलगा – मच्छे बायपास प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने सदर कामकाजाला स्थगितीचे आदेश दिले असून शेतकऱ्यातून तूर्तास समाधान व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असून त्याच शिवारात समाधानाच्या भाकरीचे तुकडेही मोडले, हे विशेष!
कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतजमिनी सरकारला देणार नाही, इंच इंच जमिनीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा पवित्रा घेतलेल्या शेतकऱ्यांनी प्राधिकरणाविरोधात चांगलीच कंबर कसली असून हाच पवित्रा शेवट्पर्यंत ठेवणार असल्याचा ध्यास घेतला आहे.