बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही भाजपच्या उमेदवारांना आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकवण्यासाठी रणनीती आखली जाणार असून यासाठी बेळगाव जिल्हा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी हॉटेल संकम येथे आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील आजी माजी आमदार आजी-माजी खासदार यांच्यासह जिल्हा भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीत सहभाग घेणार असून चर्चा विनिमय करण्यात येणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर तर लोकसभा चिक्कोडी मतदारसंघातून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा कशा जिंकल्या जातील यासाठी कोणती रणनीती आखावी काय करावं ?यावर या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
भाजपाचे दोन्ही मतदारसंघाचे प्रभारी यांच्यासह दोन्ही उमेदवार देखील या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी सायंकाळी ही बैठक घेतली जाणार असून बैठकीत मुख्यतः पदाधिकाऱ्याकडून सूचना घेतल्या जाणार आहेत.
एकूणच गो बॅक शेट्टर मोहिमेनंतर स्थिरावलेले जगदीश शेट्टर बेळगाव लोकसभा मतदारसंघात हळूहळू पाय रोवत आहेत हे यावरून देखील सिद्ध होत आहे. राज्य महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव असलेल्या आणि पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याशी शेट्टर यांचा सामना होत आहे.
तर चिकोडी मतदारसंघात बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका जारकीहोळी यांचा सामना विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याशी होत आहे चिकोडीत कोणत्या प्रकारे युवा नेत्या प्रियांका यांना रोखता येईल यावर चर्चा विनिमय केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघासाठी शनिवारी सायंकाळी होणारे बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.