बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कलखांब गावचा सुपुत्र राहुल जयवंत पाटील या २८ वर्षीय मराठी युवकाने भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राहुल पाटील या युवकाने ८०४ रँकिंग मिळवून साध्य केलेल्या या यशामुळे बेळगावची मान उंचावली आहे.
मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे एकूण 1143 जण या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यात बेळगाव तालुक्यातील राहुल याचा देखील समावेश आहे.
बेळगाव मधील वनिता विद्यालय इंग्लिश मीडियममध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून आरएलएस महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवीपूर्व शिक्षण घेतले आहे. त्यानंतर मेरिटमध्ये आलेल्या राहुल पाटीलला बेंगळुरू येथील आरव्ही कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याचे आई, वडील शेती करतात. शिवाय वडिलांचा फॅब्रिकेशनचा व्यवसायदेखील आहे,
बीई पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. याआधीही दोनवेळा राहुल पाटील याने यूपीएससीसाठी प्रयत्न केले होते.
आता तिसऱ्या टप्प्यात त्याला यश मिळाले असून बेळगावमधील आकाश चौगुले यांच्यानंतर राहुल पाटील या युवकाच्या नावाची भर पडली आहे.राहुल पाटील या युवकाने मिळविलेले हे यश तरुणासाठी प्रेरणादायी आहे.