बेळगाव लाईव्ह : सालाबादप्रमाणे बेळगाव शहरातील बसवाण गल्ली येथे बसवण्णा यात्रेनिमित्त इंगळयांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘हर हर महादेव’च्या गजरात श्री बसवण्णा देवस्थान कमिटीच्यावतीने बसवाणा यात्रेनिमित्त गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इंगळय़ांचा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवितात.
प्रथेप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्यादिवशी रात्री बसवाण गल्लीतील बसवण्णा मंदिरासमोर बैलगाडी जुंपून आंबिल गाडय़ांच्या प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी सकाळी बसवण्णा मंदिरात विधिवत पूजा करून मंदिरासमोर इंगळय़ांसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडांना अग्नी देण्यात आला.
दुपारी अनंतशयन गल्ली येथे सासनकाठय़ा आणि पालख्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हर हर महादेवच्या गजरात सासनकाठय़ा आणि पालख्या आल्यानंतर बसवाण गल्लीत मंदिरासमोर धार्मिक विधी झाल्यावर इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडला.
यामध्ये सासनकाठय़ा व पालख्या इंगळय़ांमधून धावल्या. यानंतर पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. यावेळी भाविकांनी मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.