बेळगाव लाईव्ह :अथणी तालुक्यातील सप्तसागर गावामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून वास्तव्य असलेल्या निराश्रीत गरीब कुली कामगार कुटुंबांना राहण्यासाठी सरकारने जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुशीला अशोक शिंगे व अन्य गरीब कुली कुटुंबांनी एका निवेदनाद्वारे जि. पं. सीईओंकडे करण्यात आली आहे.
सप्तसागर येथील निराश्रीत गरीब कुली कुटुंबातील स्त्री-पुरुषांनी सामाजिक कार्यकर्ते रामू पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सादर करण्यात आले.
आम्ही रोजंदारीवर काम करणारे श्रमिक कुली लोक असून गेल्या बऱ्याच वर्षापासून आमचे अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात वास्तव्य आहे. आम्ही सप्तसागर गावचे रहिवासी असल्याचा पुरावा -दाखला आमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, शाळेचा दाखला अशा विविध कागदपत्रांच्या स्वरूपात उपलब्ध आहे.
तथापि हे सर्व असून देखील बरीच वर्ष झाली गावात आम्हाला आमच्या कुटुंबासह राहण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा अथवा घर नाही. त्यामुळे आमच्यावर निवासासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आम्हाला कायमस्वरूपी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यापूर्वी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
प्रत्युत्तरादाखल त्यांनी गावातील कोणी तुम्हाला आपली जमीन देण्यास विकण्यास तयार असेल तर पहा. तसे असल्यास सरकारकडून त्या जमीन मालकाला जमिनीची योग्य किंमत देऊन ती जमीन आम्ही घरे बांधण्यासाठी तुमच्या नावे करू असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्तसागर गावातील परमानंद सत्यप्पा तेली हे योग्य किंमत मिळाल्यास आपल्या मालकीची जमीन विकण्यास तयार आहेत.
त्यांची रि.स.नं. 59/12 ही 1 एकर 2 गुंठे जमीन आमच्या निवासासाठी सुरक्षित स्थळ आहे. तेंव्हा सरकारने त्या जमिनीची योग्य किंमत देऊन परमानंद तेली यांच्या मालकीची जमीन आमच्या नावे करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.