बेळगाव लाईव्ह विशेष: निवडणूक प्रक्रिया जरी सुरु झाली असली तरी अद्याप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत. मात्र तरीदेखील बेळगाव लोकसभा मतदार संघामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर स्थानिक उमेदवार आणि परप्रांतीय उमेदवार हा मुद्दा सध्या बेळगावच्या निवडणुकीचा सर्वाधिक चर्चेला आलेला विषय असून काँग्रेसमधून निवडणूक लढविणारे विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर आणि भाजपमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. स्थानिक कोण आणि परप्रांतीय कोण कुणाचा अड्रेस कुठे हा विषय सध्या चर्चिला जात असून या मुद्द्याला अधोरेखित केल्यास बेळगावकर कुणाला झुकते माप देणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
भाजपचे उमेदवार, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे मूळचे हुबळी – धारवाड मतदार संघातील आहेत. गेल्या दहा वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी दोनवेळा बेळगावचे जिल्हा पालकमंत्रिपद भूषविले आहे. शेट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच बेळगाव सुवर्णसौधचे उद्घाटन पार पडले होते. माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी आणि विद्यमान खासदार मंगला अंगडी यांचे ते व्याही असून त्यांना यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर हे काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत. उमेदवार मृणाल यांच्या मातोश्री लक्ष्मी हेब्बाळकर या मूळच्या खानापूर मधील आहेत. मूळच्या हट्टीहोळी, खानापूरच्या असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यादेखील बेळगावमध्ये येऊन स्थायिक झाल्या आहेत. गेल्या दोन टर्म पासून बेळगाव ग्रामीण मधून आमदारकी भूषवत आहेत मात्र खानापूर हा भाग कारवार लोकसभा मतदार संघात मोडत असल्यामुळे हेब्बाळकर कुटुंबीय देखील स्थानिक नसल्याची चर्चा जनतेतून सुरु आहे. असे असताना स्थानिक कोण आणि परप्रांतीय कोण या मुद्द्यावरून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्पर विरोधी आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे.
उमेदवारी जाहीर झालेल्या काही दिवसातच भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका टिप्पण्या सुरु झाल्या असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रथम भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यावर बोचरी टीका केली. जगदीश शेट्टर हे स्थानिक नसल्याने त्यांचा पत्ता शोधावा लागेल अशी टिप्पणी केली. यानंतर अरभावी मतदार संघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हेब्बाळकरांच्या टिप्पणीला प्रत्त्युत्तर देत निवडणुकीनंतर जगदीश शेट्टर यांचा पत्ता बेळगावातच मिळेल असे विधान केले. राष्ट्रीय पक्षांचे दोन्ही उमेदवार हे मूळचे बेळगाव लोकसभा मतदार संघातील नाहीत. याउलट महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार जो निवडणूक रिंगणात उतरेल तो स्थानिक भूमिपुत्र असेल, यामुळे या उमेदवाराला सद्यस्थिती आणि सत्यस्थितीचा नक्कीच अंदाज असेल, अशा पद्धतीची चर्चाही जनतेत होत आहे.
मृणाल हेब्बाळकर आणि जगदीश शेट्टर यांची गणना ‘व्हाईट कॉलर’ नेत्यांमध्ये होते. याउलट समितीचे नेते मातीशी नाते सांगणारे आहेत. सर्वसामान्य मराठी जनतेतून आलेला उमेदवार हा स्थानिक जनतेच्या प्रश्नांची चाड असणारा असतो. त्यामुळे समितीचा नेता लोकांना जवळचा वाटतो. याउलट राष्ट्रीय पक्षांनी दिलेले उमेदवार हे स्थानिक मूळ प्रश्नाशी कधीही संलग्न राहिलेले नाहीत. त्यामुळेच बेळगावात दररोज आंदोलने सुरु राहतात. रिंगरोड, मराठी फलक, बायपास, मराठी परिपत्रके, भगवा ध्वज अशा प्रत्येक स्थानिक आंदोलनात सर्वसामान्य मराठी जनतेचे नेतृत्व करणारेच नेते गरजेचे असतात. याचप्रमाणे कन्नड भाषिक मतदारांचेही अनेक प्रश्न आहेत. रयत संघटनांसारख्या अनेक संघटना आजही न्यायासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवतात.
मात्र राष्ट्रीय पक्षांचे व्हाईट कॉलर नेते या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. स्थानिक जनतेशी राष्ट्रीय पक्षांचे नेते संलग्न नसतात. जनतेच्या समस्यांचा दुरान्वये संबंध नसणाऱ्या या नेत्यांच्या विरोधात कन्नड भाषिक भूमिपुत्र देखील विरोधातच असण्याची शक्यता आहे. जगदीश शेट्टर बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जरी दोनवेळा कार्यरत राहिले असले तरीही त्यांची कारकीर्द म्हणावी तशी लोकांना भावली नाही, रुचली नाही. त्याचबरोबर दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या कारकिर्दीतही घेतलेल्या निर्णयांवर बेळगावकर नाखुषच होते.
सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात त्यांनी, हुबळी-धारवाड साठी बेळगाव – हुबळी मार्ग निर्माण केला. यासाठी सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या गेल्या. पिकाऊ जमिनीतून केलेल्या उपक्रमाच्या विरोधात आजही जनता निषेध व्यक्त करत आहे. स्थानिक जनता आणि व्हाईट कॉलर नेते असा संघर्ष सध्या निर्माण झाला आहे. आणि याच संघर्षामुळे राष्ट्रीय पक्षांचे नेते सर्वसामान्य जनतेला कधीच आपलेसे वाटत नाहीत. पैशाचा मोठा खेळ करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले हे नेते असल्याने बेळगाव लोकसभा मतदार संघाची आगामी निवडणूक हि सामान्य माणूस आणि धनदांडग्यांचा खेळ अशीच असणार, यात वाद नाही.