बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समिती सक्रियपणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कार्यरत असून मराठीविरोधी भूमिका जपणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना निवडणुकीत मतांच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा चंग बांधण्यात आला आहे.
आज समिती उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराचा उचगाव मधून शुभारंभ करण्यात आल्यानंतर विविध समिती नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात समितीच्या धोरणाबाबत आपले विचार मांडले.
समिती नेते ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी राष्ट्रीय पक्षांच्या मराठी बाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठी भाषिकांकडे मतयाचना करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी मराठी भाषा, संस्कृतीबद्दल सर्वप्रथम आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात समितीच्या तत्कालीन आमदारांना विधानसभेत मराठीत बोलण्यापासून रोखले होते.
भारतीय संविधानाने अधिकृतरीत्या २२ भाषांना अनुमती दिली आहे. यानुसार विधानसभेत मराठीतून बोलणे ग्राह्य असूनही केवळ मराठी आकसापोटी जगदीश शेट्टर यांनी मराठी आमदारांना रोखले. अशा उमेदवाराला सीमाभागातील मराठी भाषिकांनी पाठिंबा द्यावा का? जगदीश शेट्टर यांना मतदान करावे का? असे प्रश्न मराठी भाषिकांनी विचारणे गरजेचे आहे.
सीमाभागात सातत्याने मराठी भाषा, संस्कृती वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत समितीचे हेच ध्येयधोरण असून राष्ट्रीय पक्षांनी मराठीबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दलचे विचार जाहीरपणे व्यक्त करावे असे आवाहन ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी केले.