बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्हा कार्यनिरत कंत्राटदार संघटनेने केलेल्या मागणीनुसार कंत्राटदाराशी अपमानास्पद गैरवर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चितपणे निलंबनाची कारवाई केली जाईल, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये आज शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सीईओ राहुल शिंदे यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याने कंत्राटदाराशी गैरवर्तन करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे त्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर निश्चितपणे निलंबनाची कारवाई केली जाईल. त्या अनुषंगाने आज तात्काळ चिक्कोडी विभागाला तसा आदेश बजावण्यात आला आहे, अशी माहिती दिली.
कंत्राटदार आडव्याप्पा तोकदल यांना अर्वाच्य शिवीगाळ करून अत्यंत अपमानास्पद वागणूक देणारे अधिकारी सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता ए. एन. बिरादार -पाटील यांना तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कार्यनिरत कंत्राटदार संघटनेतर्फे आज सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडण्यात आले होते.
तसेच समस्त कंत्राटदारांनी बिरादार -पाटील यांच्या वर्तनाबद्दल तीव्र संताप प्रकट केला होता. त्यावेळी कंत्राटदार संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.