बेळगाव लाईव्ह : जानेवारी महिन्यापासूनच उष्मांकात झालेली वाढ आज जागतिक जलदिनाच्या निमित्ताने काहीशी कमी झाली.
गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना वळिवाच्या पावसामुळे आल्हाददायक वाटले. बेळगाव शहर आणि परिसरात विविध ठिकाणी आज दुपारपासून तुरळक पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
दुपारी १ च्या सुमारास शहर आणि परिसरात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आज वळिवाचा पाऊस बरसणार या आशेने नागरिक पावसाची प्रतीक्षा करत होते. महाशिवरात्रीनंतर उन्हाचे चटके अधिकच तीव्र जाणवू लागले होते.
गेल्या चार – पाच दिवसात असह्य उन्हाळाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. यंदा मान्सून ने देखील दडी मारल्याने ऑक्टोबर हिट देखील अधिक तीव्रतेची ठरली. साधारणतः वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतात. तत्पूर्वी काही वेळा वळिवाचा शिडकावा झाल्याने वातावरणातील उष्मांक कमी जाणवतो.
होळीच्या दरम्यान देखील वळिवाची हजेरी असतेच, असे मानले जाते. तामिळनाडूत देखील आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम देखील वातावरणावर दिसून आला.
आज जागतिक जलदिन असून या पार्श्वभूमीवर अनेक उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात येत आहेत. यंदा मान्सून समाधानकारक न झाल्याने पाणी टंचाई देखील उद्भवली आहे.
यामुळे पाणी वाचविण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. एकीकडे पाणी टंचाई तर एकीकडे वातावरणात वाढलेला उष्मा यादरम्यान दुपारपासून सुरु असलेल्या वळिवाच्या शिडकाव्यामुळे भर उन्हात दिलासा मिळाला.