बेळगाव लाईव्ह / महिला दिन विशेष : स्त्रीला आदिशक्ती म्हणून नावाजले जाते. गृहलक्ष्मीपासून अन्नपूर्णा, स्कंदमाता, काली- दुर्गा – चंडिका या नावाने स्त्रीचा आदर केला जातो. परंतु आजच्या काळात केवळ स्त्रीने देव्हाऱ्याच्या देवीच्या स्वरूपात नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आज महिला जरी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत असल्या तरी तळागाळातील महिला आजही म्हणाव्या तितक्या पुढारलेल्या नाहीत. सोशल मीडिया, टीव्ही माध्यमे आदी ठिकाणी महिलांची अनेक रूपे दाखविली जातात खरी, मात्र प्रत्यक्षात तसे चित्र नाही.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर मिम्स, स्टेटस, प्रेरणात्मक सुविचार आदींनी धुमाकूळ घातला आहे. परंतु स्त्रियांचा आदर हा केवळ महिलादिनापुरताच त्सिमीत राहावा, इतके स्त्रीचे कर्तृत्व खुजे नाही. राजमाता जिजाऊ, वीर राणी कित्तूर चन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून आजवर अनेक क्षेत्रात कीर्ती गाजवलेल्या महिलांची नावे घेता येतील. मात्र यासारख्या क्रांतिवीर महिलांचा वारसा जपण्यात आणि तो वारसा पुढे घेऊन जाण्यात महिलावर्ग मागेच राहिला आहे.
प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. मात्र आघाडीवर असलेल्या महिलांची संख्या किती आहे? याचा देखील विचार होणे गरजेचे आहे. राजकारणासारख्या क्षेत्रात आज हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच महिला प्रतिनिधी कार्यरत आहेत. त्याही केवळ आरक्षणामुळे. मात्र आरक्षणच नसते तर याठिकाणीही महिलांचा सहभाग क्वचित दिसून आला असता. राजकारणासह समाजकारण, शिक्षण, संस्कृती, क्रीडा यासारख्या क्षेत्रातही म्हणावा तितका महिलांचा सहभाग दिसून येत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
आज देशोदेशी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, महिला सक्षमीकरणासाठी योजना आखल्या जातात, बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात मात्र इथपर्यंत महिलावर्ग पोहोचलेला दिसून येत नाही. बचत गटांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज असो किंवा जमा केलेली बचत असो या माध्यमातून क्वचितच महिलांनी खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमीकरणाची वाट धरलेली पाहायाला मिळते. मात्र बचत गट, मायक्रो फायनान्स मधून घेतलेल्या कर्जामुळे आजही कित्येक महिला आर्थिक अडचणीत सापडल्याची वस्तुस्थिती आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी योजना राबविण्यात येत असल्या तरी आर्थिक नियोजन आणि आर्थिक साक्षरतेचे धडे अद्यापही महिलांपर्यंत पोहोचले नाहीत, याची खंत आहे.
आज करमणुकीसाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र करमणुकीच्या प्रत्येक साधनात महिलेचा वापर करण्यात येतो, आणि करमणुकीच्या माध्यमातून स्त्रीचे जे रूप समाजासमोर दाखविले जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. मराठी – हिंदी मालिकांमध्ये रमणाऱ्या महिलावर्गाला आपल्यातील शक्तीची ओळख करून देण्याऐवजी खुज्या विचारांची पर्वणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मालिकाविश्वात मांडल्या जाणाऱ्या स्त्रीरूपाच्या माध्यमातून महिलावर्गाची पीछेहाट होत आहे. कर्तृत्व, दातृत्व, माया, मातृत्व, वीरता अशा स्वरूपातील रणरागिणीचे बोथट स्वरूप पाहून आज प्रत्येक वर्गातील स्त्री दिशाहीन होत आहे, हि सत्यपरिस्थिती आहे.
महिलांसमोर तब्येतीसंदर्भात आज अनेक प्रश्न, समस्या आवासून उभ्या आहेत. खऱ्या अर्थाने यासंदर्भात महिलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. मात्र केवळ भौतिक सुखाच्या बाबतीत महिलांचे प्रदर्शन मांडणाऱ्या माध्यमांवर या गोष्टीचा लवलेश दिसून येत नसल्याचे चित्र आहे. महिला दिन वगळता इतर वेळी महिलांना केवळ नाममात्र ठेवणाऱ्या समाजाने आपल्या सभोवती असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या बाबत सकारात्मक विचाराने पाहणे गरजेचे आहे. केवळ समाजानेच नाही, तर प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदर करणे हेदेखील महत्वाचे आहे. मुलगी, बहीण, पत्नी, आई, आजी, मैत्रीण यासारख्या विविध टप्प्यांवर साथ देणाऱ्या स्त्रीने स्वतःचे स्त्रीत्व स्वतः जपणे आवश्यक आहे. केवळ महिलादिनापुरताच मर्यादित आपला जयजयकार न करून घेता नेहमीच आपण आपले स्त्रीत्व गाजविणे, जपणे हेच महिलादिनाचे फलित!