बेळगाव लाईव्ह:सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे (एफएफसी) पोतदार ज्वेलर्सच्या सहकार्याने काळेनट्टी गावामध्ये 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात आला. एफएफसीचा या उन्हाळी मोसमातील या पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
काळेनट्टी (ता. बेळगाव) गावातील लोकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत एफएफसीने गावात 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्याबरोबरच जवळच्या उपनलिकेच्या माध्यमातून टाकीमध्ये पाणीपुरवठ्याची सोय करून दिली सदर उपक्रम पोतदार ज्वेलर्सचे अनिल पोतदार यांनी पुरस्कृत केला आहे.
त्याचप्रमाणे कुपनलिकेपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन घालण्याचे काम प्लंबर सुरेश कांबळे यांनी विनामूल्य करून दिले. काळेनट्टी गावात बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला पुरेशा नळांची सोय असून काल मंगळवारी सायंकाळी सदर टाकीचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, रेखा नायडू, राहुल पाटील, पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर, गौतम श्रॉफ, श्रीधर पडनवर, किरण होसकोटी, सुरेश कांबळे, आकाश केलूर, लक्ष्मण होसकोटी, सिद्धार्थ शिर्के आदींसह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
सध्या टँकरची क्षमता, क्षेत्रफळ आणि प्रवासाचे अंतर यावर आधारित पाण्याच्या टँकरची प्रति खेप किंमत सुमारे 800 ते 1500 रुपये आहे. ग्रामीण जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सरकारही उदासीन दिसते. यावर पर्याय म्हणून एफएफसीने विचार केला की खेड्यातील उपलब्ध संसाधनांचा वापर करून गरजू लोकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय का उपलब्ध करून देऊ नये? कारण ते दररोज पाण्याच्या टँकरसाठी पैसे देऊ शकत नाहीत आणि यासाठी देणगीदार/प्रायोजक शोधणे कठीण आहे.
एखाद्याने पाण्याच्या टँकरसाठी मदत केली तरी पाण्याची ही समस्या एका दिवसाची किंवा महिन्याची नसते ती दरवर्षीच असते. त्यामुळे एफएफसीने काळेनट्टी येथील हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवला आहे. त्याला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देताना टाकी बसवण्यासाठी सिमेंट काँक्रेटचा चौथरा बांधून दिला.