Monday, January 27, 2025

/

पाणी टंचाईमुळे ‘या’ गावकऱ्यांवर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : घरोघरी शौचालय बनवून देशभरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना सरकारने राबविल्या आहेत. केंद्र सरकार उघड्यावर शौच करण्यापासून देशाला मुक्त करण्याचा प्रयत्न करत असताना बेळगाव तालुक्यातील मास्कोनट्टी येथील गावकऱ्यांवर पाणी टंचाईमुळे नाईलाजाने उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली आहे.

पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे या गावातील सर्व खुल्या विहिरी कोरड्या पडल्या असल्यामुळे गावकऱ्यांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. मास्कोनटी गावाची लोकसंख्या केवळ ८०० इतकी असून या सर्वांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते.

गावात चार गल्ल्या असून त्यांना सध्याच्या परिस्थितीत दररोज चार टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र या चार टँकरद्वारे दररोज प्रतिकुटुंब चार भांडी पाणी याप्रमाणे फक्त दोन गल्ल्यांची पाण्याची गरज पूर्ण होत आहे. परिणामी गावातील प्रत्येक कुटुंबाला एक दिवसाआड चार भांडी पिण्याचे पाणी मिळते. हे गाव ज्या ग्रामपंचायती अंतर्गत येथे त्या धामणे ग्रामपंचायतीला देखील दर एक दिवसाआड सहा भांडी पिण्याचे पाणी मिळते.

 belgaum

या पद्धतीने अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत असलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त काही प्रमाणात कपडे व भांडी धुण्यासाठी वापरले जाते. परिणामी पाण्याच्या तुटवड्यामुळे घरच्या शौचालयात पाणी वाया जाऊ नये यासाठी बहुतांश गावकरी नैसर्गिक विधी उरकण्यासाठी खुल्या मैदानाचा किंवा शेतांचा आधार घेत आहेत.Maskonatti

अधिक धक्कादायक म्हणजे या गावात असलेल्या सरकारी कन्नड आणि मराठी शाळेमध्ये मुलांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपापल्या घरातून पिण्याचे पाणी आणावे लागते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात १४ हून अधिक कुपनलिका खोदण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी कुपनलिकेला पाणीच लागले नाही. आता स्थानिक आमदारांनी गावची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी एक प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याची सुरुवात अद्याप झालेली नाही, असे धामणे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष आणि मास्कोनट्टी गावचेच ग्रामस्थ अशोक पाटील यांनी सांगितले.

देशभरात स्वच्छतेसाठी खुद्द पंतप्रधान युद्धपातळीवर उपक्रम राबवत असताना अद्याप गावोगावी शौचालयाची सुविधाच उपलब्ध नसणे हि विचार करण्याची गोष्ट आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.