बेळगाव लाईव्ह : ७ मे रोजी बेळगावमध्ये तिसऱ्या टप्प्यात होणारी लोकसभा निवडणूक अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडणूक आयोग पार पाडणार असून यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक निवडणूक अधिकारी लोकेश कुमार यांनी दिला.
बेळगाव महानगरपालिकेत आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महानगरपालिका आयुक्त आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी लोकेश कुमार म्हणाले की, बेळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १२ एप्रिलला नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू असून, १९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल.
अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून आता मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी नवीन मतदारांची नोंदणी करण्याची संधी मिळणार नाही.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ महामंडळात बेळगाव उत्तर मतदारसंघ आणि दक्षिण मतदारसंघ यांचा समावेश आहे.
१९ मार्च रोजी जाहीर झालेल्या मतदारांच्या यादीनुसार बेळगाव बेळगाव उत्तरमध्ये २६१८२३, दक्षिण मध्ये २५५०२४ सर्वसामान्य मतदार, तर सैन्यदलातील ३२४ मतदार उत्तरमध्ये आणि दक्षिणमध्ये ५७२ सैन्यदलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सार्वजनिक ठिकाणचे बॅनर, भित्तीपत्रके पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून मतदारांना प्रलोभन देणारी छायाचित्र किंवा व्हिडिओ क्लिप आढळल्यास ती त्वरित सुविधा ॲपवर त्वरित पाठवावी, याबाबत संबंधित पथक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.