बेळगाव लाईव्ह : शुक्रवार दि. ८ मार्च महाशिवरात्री, दि. ९ मार्च दुसरा शनिवार तर रविवार दि. १० मार्च साप्ताहिक सुटी यानुसार आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
त्यामुळे एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार वाढणार आहेत. बँकांप्रमाणेच शासकीय कार्यालयांनाही तीन दिवस सुटी राहणार आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
अलीकडे कॅशलेस व्यवहारांवर भर वाढला आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बँका बंद राहणार असल्याने एटीएमवर ताण वाढणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार वाढणार आहेत.
कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दमदाटी नको : पालकमंत्री
बेळगाव लाईव्ह : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने बेळगावसह संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या कर्जवसुलीसाठी बळजबरी करू नये, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी वृद्धापवेतन किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेची रक्कम कर्जाच्या हप्त्यासाठी मोडून घेऊ नये, अशा सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकारी आणि बँका व पतसंस्थांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ७) बँका व प्रमुख सहकारी पतसंस्थांच्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी उपरोक्त सूचना केल्या आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी पावले उचलावीत. शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी दमदाटी करू नये, असे जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, दुष्काळामुळे पुढील तीन महिने तरी कर्जवसुलीसाठी जाऊ नये, शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांना त्रास देऊ नये, केवळ बँका आणि सहकारी संस्थाच नव्हे तर खासगी सावकारांकडूनही शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
या बैठकीला आमदार राजू सेठ, सहकार खात्याचे सहनिबंधक सुरेश गौडा, उपनिबंधक मणी एम. एन., जिल्हा लिड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.