बेळगाव लाईव्ह :घरातील लोक नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरवस्तीत घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण सुमारे 9.50 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा धाडसी चोरीचा प्रकार संकेश्वर येथे उघडकीस आला आहे.
मड्डी गल्ली, संकेश्वर येथील इफ्तिकार गौससाहेब मोमीन यांच्या घरी गेल्या 3 ते 5 मार्च दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी मोमीन यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहूनच नियोजनबद्धरीत्या चोरी केल्याचा कयास आहे.
कारण मोमीन हे गेल्या 3 मार्चपासून सहकुटुंब हुक्केरी येथील आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. नातेवाईकांकडून काल बुधवारी घरी परतले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. लागलीच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी भरवस्तीत असलेल्या मोमीन यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याबरोबरच घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यातील साहित्य विस्कटून टाकले होते. त्याचप्रमाणे कपाटातील 141 ग्रॅम (14 तोळे 1 ग्रॅम) सोन्याचे दागिने, 30 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 3 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.
चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर मुक्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करण्याबरोबरच तपास कार्य हाती घेतले. यावेळी बेळगावहून ठसे तज्ञ व श्वान पथकाला देखील प्राचारण करण्यात आले होते.
भरवस्तीत घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस खात्याने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.