बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील ३१ गावांमधील शेतजमिनी रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणार असून रिंगरोडबाबत आता सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी रिंगरोडसाठी संपादित केल्या जाणार आहेत.
तालुक्याच्या विविध गावातील शेतजमिनी संपादित केल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तिबार पिके घेणाऱ्या जमिनी या रोडमध्ये जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
जमीन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रोडसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, बाची, बिजगर्णी, गोजगा, होनगा, कडोली, काकती, कल्लेहोळ, संतिबस्तवाड आदी ३१ गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले आहे. या रस्त्यामुळे काही शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे हा रस्ता होऊ नये, या भूमिकेत शेतकरी आहेत. मात्र प्राधिकरणाकडून गोजगा गावाजवळ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात रिंगरोडला हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने रिंगरोडबाबतच्या कामकाजाला गती आली आहे. तालुक्यातील ज्या जमिनी बळकावल्या जाणार आहेत, यामध्ये बहुतांशी मराठी भाषिकांच्या जमिनींचा समावेश असून रिंगरोड, बायपास यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमिपुत्राला देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी रिंगरोडमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.