बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कर्ले गावानजीक काळेवाडी -जानेवाडी क्रॉसवर एका मोठ्या गाठोड्यातून नारळ, लिंबू, केळी, गुलाल वगैरे टाकून केलेला करणीचा भीतीदायक प्रकार स्वतःच्या हाताने हटवून सर्पमित्र व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता आनंद चिट्टी यांनी जनजागृती केली.
कर्ले गावानजीक काळेवाडी -जानेवाडी क्रॉसवर एका मोठ्या गाठोड्यात नारळ, लिंबू, केळी, गुलाल अननस वगैरे बांधून टाकण्यात आले होते. करणीचा हा प्रकार स्थानिक रहिवासी विनायक पाटील यांनी आज मंगळवारी सकाळी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आनंद चिट्टी यांच्या कानावर घालताच ते आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तसेच त्यांनी स्वतःच्या हाताने करणीचे साहित्य हटवून उपस्थित गावकऱ्यांच्या मनातील भीती दूर केली. यावेळी बोलताना सर्पमित्र असलेले आनंद चिट्टी म्हणाले की, गेल्या 15 वर्षापासून मी अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करत आहे. करण्याचे साहित्य वाईट असते असे म्हटले जाते परंतु या पद्धतीने टाकलेले करणीचे नारळ वगैरे साहित्य मी स्वतः माझ्या घरी वापरतो. करणी केलेले साहित्य ओलांडू नये, त्याकडे पाहू नये असे म्हटले जाते. मात्र त्यात काहीच तथ्य नसून या पद्धतीने आपल्या भीतीचा फायदा उठवत बुवाबाजी करणारे लोक आपली तुबडी भरत असतात.
ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. करणीद्वारे कोणत्याही गोष्टीचा बंदोबस्त करता येत नाही. आजार बरा होत नसेल तर डॉक्टरकडेच जावे लागते. भांडण कोर्टात किंवा सामंजस्याने सोडवता येतात. अशी करणी वगैरे करून एखाद्या गोष्टीचा बंदोबस्त करता आला असता तर देशाच्या सीमेवर आपल्या जवानांना प्राण गमवावे लागले नसते.
करणीद्वारे देशाच्या शत्रूचा बंदोबस्त करता आला असता. त्यामुळे लोकांनी श्रद्धा ठेवावी अंधश्रद्धा बाळगू नये असे आवाहन करून अंधश्रद्धेमुळे आपण आपलेच नुकसान करून घेत असतो हे लक्षात घेतले पाहिजे असे चिट्टी यांनी स्पष्ट केले.
विनायक पाटील यांनी अंधश्रद्धा माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात. आज शिक्षणाची गरज असताना आपला बहुजन समाज अशा बुवाबाजी -अंधश्रद्धांना बळी पडतोय ही दुर्दैवाची बाब आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे त्यातच आपली प्रगती आहे.
अंधश्रद्धाना खतपाणी घालणाऱ्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. युवा पिढीने त्यासाठी समाजात जनजागृती केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी बरेच गावकरी उपस्थित होते.