बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेतर्फे आज गुरुवारी बेळगाव शहराच्या महापौर आणि उपमहापौर तसेच सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील नागरी समस्या निवारण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.
माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या माजी नगरसेवक, महापौर व उपमहापौर यांनी आज गुरुवारी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नूतन महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्याबरोबरच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याखेरीज महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेत्यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर, वंदना बेळगुंदी, माजी नगरसेवक नेताजी जाधव आदी माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांसह विद्यमान नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
सत्काराच्या कार्यक्रमानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले की, आज आम्ही महापौरांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्यासह उपमहापौर व गटनेत्यांचा सत्कार केला. मात्र याचबरोबर शहरातील पाणीटंचाईची समस्या देखील महापौरांसमोर मांडली. बेळगाव शहरासाठी 24 तास पाणीपुरवठ्याचे नियोजन असताना 4 दिवसातून, 8 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांनी गांभीर्याने लक्ष घालून जातीने पाणीटंचाईची समस्या निकालात काढली पाहिजे. राकसकोप व हिडकल जलाशयात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहराला पाण्याच्या बाबतीत वेठीस धरले जाऊ नये असे आम्ही स्पष्ट केले आहे.
तसेच याबाबतीत अनुभवी माजी नगरसेवक महापौर उपमहापौरांचे मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सांगून माझी त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की बेळगाव शहराच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माजी नगरसेवक संघटनेतर्फे जे कांही सहकार्य हवे असेल ते आम्ही देण्यास तयार आहोत, असे सुंठकर यांनी सांगितले.