बेळगाव लाईव्ह : हल्ली प्रत्येकजण डिजिटल पेमेन्टच्या माध्यमातून सर्व व्यवहार करत आहे. बारीकसारीक व्यवहार करताना देखील प्रत्येकजण डिजिटल पेमेंट ऍप च्या माध्यमातून आर्थिक देवाण घेवाण करत आहे.
मात्र कित्येकवेळा एखाद्या क्रमांकाची गफलत झाली कि विशिष्ट व्यक्तीच्या खात्यावर जमा होणारी रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा होण्याचे प्रकार घडले आहेत.
असाच प्रकार रायबाग तालुक्यातील एका तरुणासोबत झाला. मात्र ज्या क्रमांकावर रक्कम पोहोचली ती रक्कम बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या खात्यावर जमा झाली.
आपल्या खात्यावर अनोळखी व्यक्तीकडून जमा झालेली रक्कम पाहून प्रसाद चौगुले यांनी याबाबत अधिक चौकशी केली. सदर रक्कम हि नजरचुकीने आपल्या खात्यावर जमा झाल्याचे समजताच त्यांनी पुन्हा ती रक्कम सदर व्यक्तीच्या खात्यावर पुन्हा जमा केली.
आपल्या हातून नजरचुकीने गेलेली रक्कम परत मिळाल्याबद्दल प्रसाद चौगुले यांचे त्या व्यक्तीने आभार मानले. डिजिटल पेमेन्टच्या माध्यमातून व्यवहार करताना खात्री झाल्याशिवाय आणि फेरपडताळणी केल्याशिवाय व्यवहार करू नयेत, आर्थिक व्यवहारादरम्यान दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रसाद चौगुले यांनी केले आहे.