बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे एका खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागून किंमती साहित्यासह संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वर नजीक सोलापूर गेट जवळ घडली. दैव बलवत्तर म्हणून सदर दुर्घटनेतून बस चालक व वाहकासह सर्व 40 प्रवासी सुखरूप बचावले.
याबाबतची माहिती अशी की, मुंबई येथून शर्मा ट्रॅव्हल्सची खाजगी बस 38 प्रवाशांना घेऊन बेळगाव मार्गे बंगलोरकडे निघाली होती.
ही बस आज पहाटे संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेट जवळ आली असता लाइनिंग जाम झाल्यामुळे मागील चाकांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे बसच्या मागील बाजूने पेट घेतला.
त्यानंतर झपाट्याने पसरलेल्या आगीने अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण बसला वेढले. दरम्यान प्रसंगावधान राखून बस चालक सिद्धाप्पा (रा. बेळगाव) याने क्लीनरच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बस बाहेर काढल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले.
सदर दुर्घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभालीचे कंत्राट असलेल्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
त्याचप्रमाणे संकेश्वर पोलिसांसह अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाली होती. सदर घटनेची संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.