बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात ५० लाखाहून अधिक संख्या असलेल्या मराठा समाजाला आजवर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने न्याय दिला नसून मराठा समाजाचा वापर केवळ मतांपुरता केला जात आहे, राष्ट्रीय पक्षांच्या या धोरणापासून सावध राहून, मराठा समाजाला प्राधान्य न देणाऱ्या पक्षाला मराठा समाजातील मतदारांनी मतदान करू नये, असे आवाहन राष्ट्रीय मराठा पार्टीचे शामसुंदर गायकवाड यांनी केले.
आज बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय पक्षांनी आजवर मराठा समाजाचा वापर राजकारणापुरताच केला आहे. मराठा समाजावर राष्ट्रीय पक्षांनी मोठा अन्याय केला आहे. राज्यात कोणत्याही निवडणुकीत मराठा समाजाला उमेदवारी देण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने कारवार मधून अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली.
याव्यतिरिक्त राज्यभरात कुठेही मराठा समाजाला स्थान देण्यात आले नाही. भाजपने देखील आजवर मराठा समाजाला म्हणावे तितके प्राधान्य दिले नाही. मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन हवेतच विरले.
मराठा समाजाला न्याय मिळावा, मराठा समाजाच्या वतीने प्रतिनिधित्व करता यावे यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात आज राष्ट्रीय मराठा पार्टी कार्यरत आहे.
आजवर मराठा समाजावर मोठा अन्याय झाला असून मराठा समाजाला डावलणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना मराठा समाजातील मतदारांनी मतदान करू नये असे आवाहन शामसुंदर गायकवाड यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय मराठा पार्टीचे विविध जिल्ह्याचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.