Monday, December 30, 2024

/

आकडेमोडीतील नायकाचा अमृतमहोत्सव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट्स क्षेत्रामध्ये अग्रक्रमाने ज्या कुटुंबाचे नाव घेतले जाते ते हरगुडे कुटुंब,आपल्यासह संपूर्ण कुटुंबाला आकडेमोडीत रंगवून शिक्षणाच्या अव्वल स्थानावर पोहोचविणारे रामलिंग हरगुडे हे  ३ मार्च रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या तुडये गावात जन्मलेल्या रामलिंग हरगुडे यांनी बेळगावमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सनदी लेखापाल क्षेत्राला दिलेली नवी ओळख आणि त्यांची कारकीर्द याचा त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘बेळगाव लाईव्ह’ ने घेतलेला आढावा..

पुराणकाळातील समुद्र पिणाऱ्या अवलियाच्या अन वादळ झेलणाऱ्या महामानवाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील. पुराणातील या कथा आपण जेव्हा ऐकतो त्यावेळी हि अत्यर्क काम करणारी माणसे, त्यांचे चरित्र वाचून आपल्याला नवल वाटते. त्या विस्मयकारी घटनांनी आपण चकित होतो. परंतु आजच्या नवयुगात अनेक माणसे अशी आहेत कि, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पर्वताला भिडणारी कामे केली ,अनेक अशक्य गोष्टींना शक्य केले, मोठमोठी आव्हाने पेलली… ही नररत्ने म्हणजे समाज भूषणच… त्यातीलच एक नाव म्हणजे रामलिंग हरगुडे! बुद्धीच्या भांडवलावर उभारणारं साम्राज्य म्हणून ज्या क्षेत्राची ओळख आहे ते क्षेत्र म्हणजेच सनदी लेखापालांचे (Chartered Accountant) क्षेत्र! सरासरी चार ते पाच टक्के इतकाच संपूर्ण देशात निकाल लागणाऱ्या या क्षेत्रात चिकाटीच्या जोरावर आपल्या कुटुंबातील एक दोन नाही तर तब्बल नऊ जणांना निष्णात प्रशिक्षण देणारे रामलिंग हरगुडे! रामलिंग हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील एकूण नऊ सदस्य बेळगावसह गडहिंग्लज, कोल्हापूर याठिकाणी याच क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत आहेत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील तुडये या गावातील हरगुडे कुटुंबियांकडून या क्षेत्रात होत असलेली कामगिरी बेळगावसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. याव्यतिरिक्त आजवर बेळगावसह विविध ठिकाणचे विद्यार्थीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. बिकट परिस्थितीतून वाट काढत बेळगावमध्ये चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रात नाव कामविणारे रामलिंग हरगुडे यांनी केलेली कामगिरी बेळगावसाठी नक्कीच अनुकरणीय बाब आहे.

गावात अल्पशी असणारी जमीन, शेतकऱ्याच्या पाठीमागे कायमचा असणारा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा ससेमिरा, अल्पवयात वडिलांची सुटलेली साथ, आईच्या परिश्रमाने मिळविलेले कर्तृत्व, या सर्व पार्श्वभूमीवर हरगुडेंचे जगणे हे सर्वांना दीपस्तंभासारखे आहे. माणसे जगताना केवळ स्वतःभोवती, मीपणाच्या पाशात गुरफटलेली असतात. मात्र हरगुडे यांच्यासारखी व्यक्ती यासाठी अपवादच.. विशाल दृष्टिकोन बाळगून ‘मी, माझं’ यापेक्षाही ‘आपण आणि आपलं’ या व्याप्तीत कार्य करणारे हरगुडे यांनी कुटुंबातील सदस्यांसह कित्येकांना शिक्षणाचा प्रकाशमार्ग दाखवला. बेळगावमधील सीएंचे घर अशी ओळख असणारे हरगुडे कुटुंब हे सर्वांसाठी एक आदर्शवत कुटुंब आहे. वीट, दगड, माती केवळ या गोष्टींनी घर बनत नाही तर माणसाच्या सहृदयतेने, कर्तृत्वाने, जगण्याच्या सुसंस्कृत आयामाने ते आकार घेते याच भावनेतून हरगुडे जगतात. फळांनी बहरलेल्या झाडाप्रमाणे सदोदित झुकलेले, विनम्र असणाऱ्या हरगुडेंनी कधीच आपल्या शिक्षणाचा, श्रीमंतीचा तोरा मिरवला नाही.Hargude

आपल्याप्रमाणेच समाजालाही आपल्याबरोबरीने पुढे घेऊन जाण्याच्या भावनेने हरगुडेनी समाजाला खूप काही दिले. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेने हरगुडेंनी आजवर अनेक उपक्रम राबविले. सीए क्षेत्राशी संबंधित अनेक क्लास, भाऊराव काकतकर महाविद्यालयात अध्ययन करताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. रामलिंग हरगुडे यांच्याकडून शिक्षणाचा वसा घेतलेले अनेक विद्यार्थी आज बेळगावमध्ये आपल्याला मिळतील. आपण केलेले काम या हाताचे त्या हातालाही कळता कामा नये, या भावनेने आजवर हरगुडे यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. सर्वांसाठी असणारा ममत्वभाव, लाघवी आणि प्रेमळ स्वभाव असे एकंदर व्यक्तिमत्व त्यांच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हरगुडेमय करतो.Hargude

पसा भरून देणारे गावातलं प्राथमिक शिक्षण, ओंजळीतून सांडणारे बेळगावातील महाविद्यालयीन शिक्षण… हरगुडेनी ज्ञान टिपले ते चातक पक्षी होऊन! प्रत्येक ठिकाणी त्यांची अव्वलतेची परिसखुण भाकरीचा चंद्र खरी करणारी ठरली. दारिद्र्याची रेषा पुसट करण्यासाठी त्यांचे शिक्षण ही भीष्मशक्ती झाली.

चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सी.ए. हा अभ्यासक्रम म्हणावा तितका सोपा नसतो. देशात चार्टर्ड अकाउंटंट्सची संख्या खूप कमी आहे. जर कोणत्या क्षेत्रात परीक्षेचा निकाल कमी लागत असेल तर तो याच क्षेत्रातील लागतो. अतिशय कमी टक्केवारी असणाऱ्या या क्षेत्रात चार्टर्ड अकाउंटंट होणं हि साधी बाब नसते. मात्र हरगुडे कुटुंबीयांनी या क्षेत्रात शैक्षणिक क्रांती करत तब्बल ९ चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रात उतरवले आहेत.

‘पळीभर केलं आणि गावभर सांडलं’! अशा वृत्तीची माणसे आपल्याला सर्रास सापडतात. परंतु आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीचे भांडवल न करता समाजासाठी केलेले कार्य शांतपणे पार पाडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामलिंग हरगुडे! एखाद्या व्यवसायाकडे किंवा एका सेवेकडे एखादे कुटुंब कशापद्धतीने पाहते याचे हरगुडे कुटुंबीय हे उत्तम उदाहरण आहेत. हरगुडे कुटुंबीयांचा कणा असणारे रामलिंग हरगुडे हे समाजासमोर एक शालीन खंबीरतेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. अशा या आकडेमोडीत रंगलेल्या सीए कुटुंबाला आणि त्यांच्या कुटुंब प्रमुखांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या ‘ टीम बेळगाव लाईव्ह’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!Pradeep ashtekar

हे देखील वाचा….

*’चार्टर्ड अकाउटंटचे कुटुंब’…. वाचा बेळगाव live विशेष*

चार्टर्ड अकाउंटंट दिनविशेष : ‘चार्टर्ड अकाउंटंट्स’चे कुटुंब!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.