बेळगाव लाईव्ह : गेल्या ५० वर्षात देशात काँग्रेसने खूप प्रगती केली. जनतेचे जीवनमान उंचावले. मात्र गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिले. भाजपने दिलेली आश्वासने हि पुष्पक विमानासारखी आहेत, अशी टीका सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. गेल्या १० वर्षात भाजपने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा जाब आता जनतेनेच त्यांना विचारावा असा सल्लाही त्यांनी जनतेला दिला.
बेळगावमधील गांधी भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या बेळगाव उत्तर च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेसने बेळगाव आणि चिकोडी येथे सर्वेक्षण केले असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारने राबविलेल्या विविध हमी योजनांचा लाभ जनतेला झाला आहे. हि बाब जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आता कार्यकर्त्यांना करायचे आहे. काँग्रेसने जलाशय, इस्रो, विद्यापीठ, आयआयटीसह अनेक संस्था उभारल्या आहेत. काँग्रेसने केलेल्या विकासामुळे आज भारत जगज्जेता आहे. बेळगाव आणि चिकोडी मतदार संघात तरुण आणि सुशिक्षित उमेदवार निवडणूक रिंगणात काँग्रेसने उतरवले असून भविष्यात पक्षासाठी आणि जिल्ह्यासाठी ते मोठी संपत्ती ठरतील, त्यामुळे त्यांना सर्वानी साथ द्यावी, असे आवाहनही सतीश जारकीहोळी यांनी केले.
काँग्रेसने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार हे पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकले असते. परंतु दोन्ही उमेदवारांनी आपल्या भवितव्याचा त्याग करून जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन्ही उमेदवार समाजकारणात आधीपासून रमले आहेत. त्यांच्यासाठी राजकारण जरी नवे असले तरी भविष्यात ते मोठे काम करतील, असा विश्वासही सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. तरुण खासदारांना संसदेत पाठविण्याचे श्रेय बेळगाव आणि चिक्कोडीला मिळणार असून दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना महिला आणि बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी जारकीहोळी यांनी , बेळगावच्या विकासाबाबत संसदेत आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. बेळगावच्या विकासासाठी तरुण नेतृत्व आपल्यासमोर उभं आहे. मृणाल हेब्बाळकर आणि प्रियांका जारकीहोळी यांच्यासारखे पदवीधर, तरुण नेतृत्व दिल्लीत प्रतिनिधित्व करेल, आणि बेळगावच्या विकासासाठी नक्कीच यांचा फायदा होईल. आजवर काँग्रेसने अनेक योजना राबविल्या. महिलांसाठी विशेष योजना लागू केल्या.
बेळगावचा अधिक विकास करण्यासाठी संसदेत मुद्दा मांडून अनुदान आणण्याची गरज आहे. हे काम प्रियांका आणि मृणाल या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून होऊ शकते. यासाठी हि सुवर्णसंधी गमावू नका, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले.
विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजप खासदारांवर निशाणा साधत संसदेत उभं राहून बोलण्याची हिम्मत भाजप खासदारांमध्ये नाही, असा टोला लगावला. देश आणि राज्य संकटात आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. यासाठी बेळगाव आणि चिकोडीसाठी काँग्रेसने विचारपूर्वक उमेदवार निवडले असून आपल्या देशाचे नेतृत्व पुढील पाच वर्षे कोण करणार हे आता जनतेने ठरवायचे आहे. दरवाढ, महागाई, बेरोजगारी याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करून ईडी आणि आयटी संस्थांचा गैरवापर करत आहेत. देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्यांना आगामी निवडणुकीत योग्य उमेदवाराला विजयी करून चोख प्रत्त्युत्तर द्यावे, असे आवाहन चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ, माजी मंत्री ए.बी.पाटील, शशिकांत नायक, माजी आमदार काकासाहेब पाटील, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवडसन्नावर, आर.पी.पाटील, युवराज पाटील, डॉ. कदम, किरण साधुनवर, सुनील हणमनवर, मुजमिल डोणी, सी.बी.पाटील, बायरे गौडा कणबर्गी, सुधीर गडदे, मल्लेश चौगुले, राजदीप कौजलगी आदींसह विविध भागातील नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.