बेळगाव लाईव्ह : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस धर्माच्या नावावर राजकारण करून नाही तर विकासाच्या अजेंड्यावर विजयी ठरेल, राज्यात २० हुन अधिक जागांवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
बेळगावमध्ये एस. जी. बाळकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या कामाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या अजेंड्यासह आगामी लोकसभा निवडणूक रणनीती बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी भाजपावर निशाणा साधत भाजपाकडे असलेल्या मोदी आणि राम या दोन गॅरंटीविरोधात लढण्यासाठी काँग्रेस स्वतःचे धोरण लढवत असल्याचे सांगितले. भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र भाजप समर्थकच केवळ रामाचे भक्त नसून देशभरात अनेकजण रामभक्त असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी पक्षबदल करतात. रमेश कत्ती हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असून यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, .
इतर पक्षात असमाधानी असलेले नेते आमच्या पक्षात येऊ इच्छित असतील आणि ते जर काँग्रेसच्या धोरण आणि तत्त्वांशी सहमत असतील, तर त्यांचे आम्ही पक्षात स्वागतच करू. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी विद्यमान व माजी आमदारांची तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार असून अंतिम निर्णय मात्र हायकमांडच घेईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील आदी उपस्थित होते.