बेळगाव लाईव्ह : किणये येथील प्राथमिक समुदाय आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारामुळे संतीबस्तवाड येथील बाळंतीण आणि नवजात शिशुला जीव गमवावा लागला आहे. प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड या गावातील लक्ष्मी लगमप्पा हळ्ळी (२८) या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना किणये येथे घडली आहे. प्रसूती वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी सदर महिलेला रुग्णालयात दाखल केले.
रविवारी रात्री उशिरा किणये येथील समुदाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्यानंतर पहाटे लक्ष्मी हळ्ळी यांची प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयात जाहीर झाले. दरम्यान, डॉक्टर आणि नर्सच्या दुर्लक्षामुळे लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
प्रसूतिवेदना सुरु झाल्याने समुदाय आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर खबरदारी घेऊन उपचार करणे आवश्यक होते. रविवारी रात्री दीडच्या सुमारास तिला किणये आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. सव्वातीनच्या सुमारास तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. नंतर काही वेळातच तिला अतिरक्तस्राव सुरु झाला. त्यावेळी तिच्यावर योग्य उपचार करण्याऐवजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला गेला.
प्रसूतीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर देखील उपलब्ध नव्हते आणि रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. खाजगी वाहनातून जिल्हा रुगालयात महिलेला हलविण्यात आले, आणि पुढील प्रकार घडला अशी माहिती मृत लक्ष्मी हळ्ळी यांच्या पतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आपल्या पत्नीचा जसा मृत्यू झाला त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेची अशाचप्रकारे सरकारी रुग्णालयात हेळसांड होते.
योग्य उपचार व सुविधा मिळत नाहीत. डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा जीव गेला असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मृत लक्ष्मी हळळी यांच्या पतीने दिली.
जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच या प्रकरणातील सत्य उलगडणार आहे.