बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे रस्ता ओलांडणारी एक वृद्ध महिला परिवहन मंडळाच्या बस खाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार जवळच्या ग्रामीण भागातून बेळगाव शहरात आलेली ही 60 वर्षीय महिला चन्नम्मा सर्कल येथे डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडत होती. रहदारीच्या वेळी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेली ही महिला थेट परिवहन मंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली आली.
प्रसंगावधान राखून बस चालकाने बस तात्काळ थांबवली तरी तोपर्यंत उशीर झाला होता. कारण तोपर्यंत दुर्दैवाने ती महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत पावली होती.
ठार झालेल्या मृत महिलेची ओळख तात्काळ पटू शकली नाही. अपघात स्थळी रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला. सदर महिला शाहू नगर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून नातेवाईकाना अपघाताची कल्पना दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. सदर अपघाताची रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.