Monday, December 23, 2024

/

दिग्गजांच्या मांदियाळीत रंगणार लोकसभा निवडणूक!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक.. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेपेक्षाही अधिक चुरस पाहायला मिळते ती उमेदवारी कुणाला मिळणार या विषयाकडे! निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याआधीच उमेदवारीसाठी राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये मोर्चेबांधणी पाहायला मिळते. बॅनरबाजी, जाहिरातबाजी, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेमध्ये वावरणे यासारख्या गोष्टी राबवत उमेदवार आधीपासूनच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी करत असतो.

पक्षश्रेष्ठींना अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी जोरदार जम लावावा लागतो तर दुसरीकडे तिकीट मिळविण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते. सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेच काहीसे वातावरण अनुभवायला मिळत असून आजी माजी लोकप्रतिनिधींसह त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांची उमेदवारीची चर्चा अधिकाधिक रंगत चालली आहे. आगामी लोकसभा निवडणूक हि केवळ पक्षाभिमुख होणार नसून ती व्यक्तिभिमुख होणार असे चित्र सध्या दिसत आहे.

सध्या संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा आहे ती बेळगाव लोकसभा मतदार संघाची. या मतदार संघातून भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या विद्यमान मंत्री, ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दोन्ही उमेदवार तयारीला लागले असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. १९९९ साली झालेल्या निवडणुकीपासून बेळगाव लोकसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने बेळगाव लोकसभा मतदार संघ राखून ठेवण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.Loksabha

राज्यात सध्या काँग्रेसच्या हमी योजनांचा करिष्मा पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पूर्ण ताकदीनिशी आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी जोर लावत असून भाजप विरुद्ध काँग्रेस पेक्षाही शेट्टर विरुद्ध हेब्बाळकर यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. बेळगावमधील हि राजकीय परिस्थिती पाहता बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची उत्कंठा पूर्वीपेक्षाही अधिक निर्माण झाली आहे.

बेळगावप्रमाणेच चिकोडी लोकसभा मतक्षेत्रातही अशीच चुरस पाहायला मिळणार असून राज्यातील प्रभावशाली नेत्यांमध्ये नाव येणाऱ्या मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्येला काँग्रेस उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याचे वृत्त आहे. राजकारणापेक्षाही प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात विजय मिळवून राज्याच्या राजकारणात आपला करिष्मा दाखवण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी पुढे आल्याने या निवडणुकीने चिक्कोडी मतदारसंघात प्रचंड उत्सुकता आणि उत्कंठा निर्माण झाली आहे.

याचपाठोपाठ उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातदेखील उत्सुकतेचे वातावरण पसरले असून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदार संघात भाजपकडून नवा उमेदवार रिंगणात उतरविला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांची उमेदवारी हुकली जाण्याची शक्यता आहे तर मोदी समर्थक चक्रवर्ती सुलिबेले यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल अशी माहिती राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात चक्रवर्ती सुलिबेले यांनी प्रतिक्रिया देताना संधी मिळाल्यास आपण निवडणूक लढाऊ असे विधान केले त्यामुळे उत्तर कन्नड राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपच्या विरोधार्थ या निवडणुकीत काँग्रेसकडून खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

एकंदर राजकीय परिस्थिती आणि क्रियाकलाप पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षापेक्षाही व्यक्तीला अधिक महत्व देत निवडणुकीची चुरस वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर, आजी – माजी लोकप्रतिनिधी, राज्यात प्रभाव टाकणारी नेतेमंडळी या निवडणुकीत जातीने लक्ष देत प्रतिष्ठेने निवडणूक लढवून विजयी होण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. दिग्गजांच्या या मांदियाळीत आगामी लोकसभा निवडणूक पूर्वीच्या इतर निवडणुकीपेक्षा अधिक उत्कंठावर्धक ठरेल, यात शंका नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.