Monday, January 13, 2025

/

जारकीहोळींचा एक चाक डाव आणि हेब्बाळकरांची गोची!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ येतात. त्या पाच विधानसभा मतदार संघातील ग्रामीण मतदार संघ वगळता उर्वरित मतदार संघांवर जारकीहोळी गटाचे वर्चस्व आहे.

पण बेळगाव लोकसभा मतदार संघात यावेळी विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मिळविली. आणि बेळगावच्या राजकारणातल्या घडामोडी गतिमान व्हायला सुरु झाल्या.

लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे साप – मुंगुसाचे वैर बेळगावच नाही तर राज्यभरात सर्वश्रुत आहे. ते काही आता लपून राहिले नाही. आपल्या कार्यक्षेत्राची वाढ करण्यासाठी दोन्ही कुटुंबाकडून नियमितपणे प्रयत्न होत आहेत.

जारकीहोळी कुटुंबं वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारणात सक्रिय आहे. शिवाय जिल्ह्यावरदेखील जारकीहोळी कुटुंबाने बऱ्यापैकी पकड मिळविलेली आहे. त्यांना विरोध करणारे हेब्बाळकर कुटुंबीय. त्यांनी घरात दोन आमदारक्या, एक मंत्रिपद मिळवून आपलाही बाणा दाखवून दिलेला आहे. या लोकसभा निवडणुकीत मृणाल हेब्बाळकर विजयी ठरले तर लक्ष्मी हेब्बाळकरांचे प्रस्थ गोकाक, अरभावी पर्यंत पोहोचणार आहे. याची दखल जारकीहोळी कुटुंबाने निश्चितच घेतली असणार आहे.

या परिस्थितीत राजकारण कसं रंगवायचं, कुठपर्यंत पोहोचवायचं, आणि मृणाल हेब्बाळकरांची उमेदवारी कशापद्धतीने यशस्वी करायची कि अयशस्वी करायची याचे धोरण जारकीहोळी कुटुंबं निश्चितच रंगवत असणार आहे. कारण लक्ष्मी हेब्बाळकरांनी म. ए. समितीकडून ज्यापद्धतीने ग्रामीण मतदार संघ काढून घेतला, हि महत्वाकांक्षा पाहिल्यानंतर जारकीहोळी यांनी निश्चितच लक्ष्मी हेब्बाळकरांच्या कार्यक्षमतेची जाणीव करून घेतली असणार यात काही शंकाच नाही.

आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांची एकंदर राजकारणाची गती स्थिती, त्यांची एकंदर कार्यपद्धती, जनतेच्या अडीअडचणीत धावून जात मदत करणं, जनतेशी वागणे आणि त्याचबरोबर सढळ हस्ते मदत करणे या सगळ्या बाजू पाहता त्या प्रत्येक मतदार संघात कमी कालावधीत लोकप्रिय होत गेल्या. आज त्यांचे जे प्रस्थ ग्रामीण मधून उत्तर, दक्षिण यासह इतर मतदार संघात वाढणार आहे, हे निश्चितच जारकीहोळींना नको असणार आहे. त्यामुळे मृणाल हेब्बाळकरांची उमेदवारी यशस्वी होणार कि अयशस्वी होणार याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

दुसऱ्या बाजूला एकच कुटुंबात परत एकदा सग्यासोयऱ्यातून आलेली उमेदवारी जगदीश शेट्टर यांच्या माध्यमातून अंगडिंच्याच घरात आलेली उमेदवारी मतदारांच्या किती पचनी पडते, हा एक संशोधनाचाच विषय ठरेल. अंगडींना दुसऱ्या निवडणुकीनंतरच विरोध सुरु होता. पण प्रत्येकवेळी काहीतरी अघटित घडत गेले. आणि त्याचे रूपांतर अंगडिंच्या विजयात झाले.

पोटनिवडणुकीत निसटता विजय मंगला अंगडी यांनी मिळविला. परंतु यावेळी ते मताधिक्य टिकविणे, समोर असणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि काँग्रेसचं आव्हान पेलणे , पुन्हा अंगडीच्याच घरी जगदीश शेट्टर यांच्या माध्यमातून दिलेली उमेदवारी, बेळगाव बाहेरचे असणारे जगदीश शेट्टर, अनेक दिग्गज भाजप नेत्यांची नाराजी, नाराज नेत्यांनी वेगळ्या पद्धतीने केलेले आंदोलन या सर्व पार्श्वभूमीवर भाजपमध्येही सर्व आलबेल आहे असे नाही. जर शेट्टर यांच्या पाठीचा हात भाजप कार्यकर्त्यांनी घेतला, आणि या कार्यकर्त्यांना हात आखडता घेण्याची किमया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी साधली तर निश्चितच मृणाल हेब्बाळकर यांची उमेदवारी शेट्टर यांच्यापेक्षा सरस ठरू शकते. भाजपकडून कानपिचक्या देऊन आणि एकंदर पुढच्या राजकारणाला बाधा येईल अशापद्धतीची काही रचना केली तर नाखुशीने का होईना, भाजपच्या नेत्यांना कामाला लागावे लागेल.

कारण त्यांचे प्रगती पुस्तक दिल्लीत लिहिले जाणार आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही काहीसे धास्तावलेले आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच बाब लक्षात येते, कि या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे पारडे जड का हलके होणार हे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर नाही तर लोकांच्या कर्तृत्वावर असल्यामुळे, दुसऱ्याचे धनुष्य आणि आपला बाण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही धोरण कोणत्या पद्धतीने जाते यावरदेखील काही मतं अवलंबून आहेत. बऱ्याच प्रमाणात लोक आणि समिती नेतेही मोठ्या प्रमाणात भाजप आणि काँग्रेसच्या गळाला लागलेले आहेत.Loksabha

काही लोकांचे मत ५०० उमेदवार, ७०० उमेदवार उभं करणे, असं आहे तर काही लोक केवळ एकच उमेदवार उभं करून लाखोंच्या संख्येने मतं मिळविणे, अशा सूचना देत आहेत. यामागचे गौडबंगाल काय आहे हे कळत नाही. त्यामुळे समितीच्या एकंदर प्रक्रियेत सगळंच कांबळ्याखालचा अंधार दिसत आहे. त्यामुळे कुठे कुठे काय चाललंय? अंधाऱ्या रात्री काय घडत आहे हे निश्चित न समजल्यामुळे समितीची वाटचाल समजण्यास काही वेळ जाणार आहे. पण एका टप्प्यावर समितीची मते निर्णायक ठरणार यात काही वादच नाही. समितीने योग्य आणि तगडा उमेदवार दिला, तर मात्र समितीची मते वाढतीलाच. त्याचबरोबर दिल्लीला शेट्टर यांना पाठवायचे कि हेब्बाळकरांना हे ठरविणे मात्र समितीच्याच हाती असेल, यात काही वाद नाही. त्यामुळे समितीचे सूत्रे कुणाच्या हातात? शेट्टर – हेब्बाळकरांचे राजकारण कसे चालणार? या सर्व गोंधळात बेळगाव लोकसभा निवडणूक गर्तेत सापडली आहे.

खोल अंधाऱ्या विहिरीत जाणाऱ्या पायऱ्यांप्रमाणे हे अंधारे जग कधी उजेडात येणार? हेच समजत नाही. त्यामुळे बेळगाव लोकसभा निवडणुकीचं गणित कागदावर वेगळं, प्रत्यक्षात वेगळं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.