बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेले पोलीस फेसबुक पेज स्थानिकांसाठी तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ ठरत असून या पेजला सध्या 36 हजार ‘फॉलोअर्स’ लाभले आहेत.
वाढत्या लाईक्स मिळत असलेल्या पोलीस फेसबुक पेजचा वापर स्थानिक नागरिक वाहतूक नियम आणि स्थानिक सामान्य तक्रारींसंदर्भात करीत आहेत.
पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या पोलीस फेसबुक पेजवर दररोज 10 ते 12 तक्रारी मांडल्या जात आहेत. ज्यात पोलिसांकडून जरी नियमांचे उल्लंघन झाल्यास स्थानिक नागरिक या पेजवर ती माहिती शेअर करत आहेत.
बेळगाव शहरात पोलिसांनी लावलेले गुन्ह्यांचे छडे, पोलिसांनी हाती घेतलेले उपक्रम, नागरिकांना सतर्कतेचे संदेश देणे आदी माहिती या फेसबुक पेजवर शेअर केली जात आहे. या पद्धतीने स्वतःचे फेसबुक पेज तयार करून सोशल मीडियावर सक्रिय होणाऱ्या शहर पोलीस आयुक्तलयाच्या या उपक्रमाला आपुलकीची थाप मिळत असून या पेजवरील फॉलोवर्स मते मांडताना दिसतात.
पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या संकेतस्थळावर आयुक्तालय कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व पोलीस स्थानकांचे आणि त्यांच्या निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक, स्थानकाची व्याप्ती वगैरे माहिती उपलब्ध आहे.
पूर्वी पोलीस स्थानाचा क्रमांक किंवा निरीक्षकाचा मोबाईल क्रमांक हवा असल्यास 100 नंबरला फोन करावा लागत होता. मात्र ही सेवा बंद झाल्यानंतर आता नागरिक थेट ‘गुगल सर्च इंजिन’ वर जाऊन बेळगावातील कोणत्याही स्थानकाचे नांव सर्च केल्यास थेट शहर पोलीस संकेतस्थळाला लिंक होत असून शहरातील प्रत्येक ठाण्याचे क्रमांक उपलब्ध होत आहेत.