बेळगाव लाईव्ह:बेळगावचे कलाकार व छायाचित्रकार योगी बिरादार आयोजित ‘छाया रंगाविष्कार’ या चित्रकला आणि छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
कला महर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी वरीलकर नाट्यगृह टिळकवाडी येथे आयोजित या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलाकार प्रसाद पंडित क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर व माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी आयोजकांतर्फे मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रसाद पंडित यांनी जसे साधू महात्म्यांना त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या सभोवतीच्या आध्यात्मिक वलयाद्वारे तात्काळ ओळखता येते तसे कलाकार देखील त्यांच्या चेहऱ्यावरून तात्काळ ओळखून येतात असे सांगून मितभाषी योगी बिरादार यांच्या कलेचे कौतुक केले.
याप्रसंगी वरेरकर नाट्य संघाचे जगदीश कुंटे यांच्यासह अन्य मान्यवर आणि कलाप्रेमी उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या कलाकृती पाहून प्रशंसोद्गार काढले.
प्रदर्शनाचा आनंद लुटल्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना सिने कलाकार प्रसाद पंडित म्हणाले की, योगी बिरादार यांनी प्रदर्शनात मांडलेली आपली पेंटिंग्स व इतर कलाकृती इतक्या अप्रतिम आहेत की मन हरखून जातं. वाटतं यातील एक तरी पेंटिंग आपण घरी घेऊन जावं. आपण काढलेल्या फोटोंचे योगी बिरादार यांनी स्वतः आपल्या कुंचल्यातून चित्रात रूपांतर केले आहे. त्यांनी ही किमया जी साधली आहे ती पाहता हा फोटो आहे की चित्रकृती? असा बघणाऱ्याला प्रश्न पडतो.
हे कौशल्य अतिशय आगळं, दुर्मिळ वाखणण्याजोग आहे असे सांगून बेळगावच्या कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा आणि एखादे पेंटिंग आवडले, ते आपल्या घरी असावे असे वाटले तर त्याची जरूर खरेदी करावी.
ज्यामुळे आपण त्या कलाकाराचा खऱ्या अर्थाने सन्मान केल्यासारखे होईल, असे आवाहन प्रसाद पंडित यांनी केले. कलाकार व छायाचित्रकार योगी बिरादार यांचे ‘छाया रंगाविष्कार’ हे चित्रकला आणि छायाचित्र प्रदर्शन येत्या 13 मार्चपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.