Thursday, December 19, 2024

/

प्यास’, ‘एकेपी’ करणार 100 वर्षे जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील प्यास फाउंडेशनतर्फे एकेपी फेरोकास्टसच्या सहकार्याने टीचर्स कॉलनी खासबाग परिसरातील 100 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन विहिरीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून दयनीय अवस्थेत असलेल्या सदर विहिरीचा विकास केला जावा, अशी विनंती स्थानिक नगरसेविका प्रीती खामकर व रहिवाशांनी प्यास फाउंडेशनला केली होती.

स्वातंत्र्यपूर्व काळात 1916 मध्ये खासबाग येथे 4 गुंठे परिसरात विहीर खोदण्यात आली होती. तसेच सुरुवातीपासून विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या विहिरीतील पाण्याचा चांगला लाभ मिळत होता. मात्र कांही वर्षानंतर विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि आजूबाजूला जलपर्णी वाढल्याने विहिरीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या विहिरीकडे पुन्हा एकदा लक्ष देणे गरजेचे असल्याचे समजल्यानंतर प्यास फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विहिरीचा विकास करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार गेल्या शनिवारी दक्षिण आमदाराच्या हस्ते भूमिपूजन करून विहिरीच्या विकास कामाला चालना देण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका प्रीती खामकर, एकेपी फेरोकास्टचे संचालक पराग भंडारे, डॉ माधव प्रभू, विनायक खामकर, प्यास फाउंडेशन कार्यकारणीचे सदस्य आणि खासबागचे नागरिक उपस्थित होते.Pyas

सदर विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महापालिकेतर्फे जलशुद्धीकरण उपकरण बसवून परिसराला पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यामुळे टीचर्स कॉलनीसह खासबाग परिसरातील पाणी समस्या कायमची निकालात निघणार आहे. शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे.

त्यामुळे तलाव आणि विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खासबाग येथील ब्रिटिश काळातील विहीर विस्तीर्ण आहे. त्यामुळे विहिरीतील गाळ काढून विहिरीची बांधणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. या विकास कामासाठी एकेपी फेरोकास्ट यांचे सहकार्य लाभत आहे, अशी माहिती प्यास फाउंडेशनचे संचालक डॉ. माधव प्रभू यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.