Monday, May 6, 2024

/

कार्यकर्ता” की “कडीपत्ता”?? ऐका “समिती” च्या कार्यकर्त्यांची व्यथा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कुठल्याही संघटनेला आपल्या ध्येयधोरणानुसार संघटीत होऊन लढायचं असेल तर “कार्यकर्ता” हा त्या संघटनेचा पाया आणि गाभा दोन्ही असतो, पण जसा स्वयंपाकात कडीपत्याचा तात्पुरत्या सुगंधपुरता वापर करून बाजूला काढून टाकला जातो, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यालाही बाजूला सारलं जातं. हि समस्या प्रत्येक संघटनेत उद्भवते. तसाच प्रत्यय महाराष्ट्र एकीकरण समितीतीतील प्रत्येक निष्ठावंत, होतकरू व कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्याना वेळोवेळी येत आहे.

सध्या देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि सीमाभागातील मराठी माणूसही या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपली मराठी अस्मिता जपण्यासाठी, आपलाही उमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्फत देण्यासाठी पुढे सरसावला आहे.
पण काहींच्या हेकेखोर व एककलमी वृत्तीमुळे संघटनेचा मूळ गाभा असलेला “कार्यकर्ता” च दुरावत चालला आहे, कार्यकर्त्याला विश्वासात न घेणे प्रत्येक वेळी त्याला गृहीत धरून आपले कार्यक्रम तसेच पुढे रेटणे, कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेल कधी समजून न घेणे आणि आपले निर्णय लादणे हा एककलमी कार्यक्रम आजपर्यंत नेतृत्वाने जोपासला आहे, त्यामुळे संघटना खिळखिळी होत चालली आहे, लढ्याची व आंदोलनाची धार बोथट होत चालली आहे.

मागील २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील घडामोडी याला उदाहरण म्हणून देता येतील. खानापूर समितीमध्ये एकी घडवून पुनर्रचना करण्यासाठी बेळगावातील ज्येष्ठ नेत्यांनीच पुढाकार घेतला, फक्त पुढाकारच घेतला नाही तर एकी करून उमेदवार निवड ते उमेदवार निवडून आमदार निवडून आणतो म्हणून जबाबदारी घेतली होती, पण घडलं उलट. उमेदवाराने सन्मानजनक मतेही मिळविली नाहीत, तर मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, मग याची जबाबदारी घ्यायची वेळ आली तेंव्हा सगळे चिडीचूप झाले, आणि एकमेकाला दूषण देण्याचं काम सुरू झालं.

 belgaum

ग्रामीण मतदार संघातही तोच प्रकार पाहायला मिळाला. एका मातब्बर नेत्याला उमेदवारी देतो म्हणून राष्ट्रीय पक्षातून समितीत आणण्यात आले. जो पूर्वाश्रमी समितीचाच होता, पण ग्रामीणच्या जनतेने पूर्वाश्रमीच्या गद्दारीला जागा दाखवत नवतरुणाला संधी दिली. त्या नवतरुणाला उमेदवारी मिळणं शक्यच नाही म्हणून फुशारकी मारणाऱ्या त्या नेत्याची मात्र नामुष्की झाली व सगळे मनसुबे धुळीस मिळाले.

शहरात देखील तोच प्रकार झाला. ग्रामीणला राष्ट्रीय पक्षात जाऊन समितीतआलेल्या नेत्याला उमेदवारी द्यायची ठरल्याने ग्रामीणच्या माजीला दक्षिण मधून अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. पण शहर समितीतील कार्यकर्त्यांच्या प्रखर विरोधामुळे माघार घ्यावी लागली व नाचक्की झाली.

बेळगाव दक्षिणमधील उमेदवार निवडताना देखील माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेता निवड कमिटीचा अध्यक्ष होता. मुळात हा नेता तब्बल 14 वर्षांनी शहर समितीत व मध्यवर्तीच्या बैठकीत स्थानापन्न झाला होता, पण ऐन उमेदवार निवडप्रक्रियेवेळी मात्र किंबहुना राजकीय आजाराचे सोंग करून तो नेता या सर्व प्रक्रिये पासुन दूर झाला. या सर्व प्रकारामुळे कार्यकर्त्यांची मात्र हेळसांड झाली. अशावेळी विरोधाला विरोध म्हणून कार्यकर्त्याची मात्र नेतृत्वाला वेळोवेळी गरज भासते. परंतु इतरवेळी मात्र विश्वासात घेण्याची वेळ येते तेंव्हा “कार्यकर्ता” मात्र “कडीपत्ता” होतो.

ज्यावेळी खानापूर समितीची एकीसह पुनर्रचना करायची होती त्यावेळी पाच जणांची कमिटी नेमण्यात आली होती, २०२३ चा “महामेळावा” आयोजित करायचा होता त्यावेळीहि “पाच” जणांची कमिटी नेमून कुणालाही नपटणारा निर्णय घेण्यात आला. सध्या जी कन्नडसक्ती चालू आहे त्यावरही “पाच” जणांची कमिटी नेमून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले, व घटक समित्यांनी आंदोलनाबद्दल निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले. पण घटक समितीने यावर काय निर्णय घेतला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या निर्णयाची प्रतीक्षा मात्र प्रत्येक कार्यकर्त्याला लागली आहे. या सर्वांचा बोलविता धनी कोण ? त्यापासूनही कार्यकर्ते अनभिज्ञ आहेत. आता नेत्यांनीच यातून बोध घेऊन पुन्हा समितीला जुनी झळाळी आणून देण्याची आवश्यकता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.