बेळगाव लाईव्ह विशेष : महाराष्ट्र एकीकरण समिती या मराठी भाषिकांच्या हक्काच्या संघटनेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून कार्यकर्त्यांची मते लक्षात घेत जम्बो कार्यकारिणीची निवड केली.
आजवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध घटक समित्यांमध्ये कार्याध्यक्षपद अस्तित्वात होते. मात्र शहर समितीमध्ये हे पद रिक्तच होते. जाणीवपूर्वक रिक्त ठेवण्यात आलेल्या या पदावर अखेर नूतन कार्यकारिणीच्या दुसऱ्याच बैठकीत समितीचे कार्यकर्ते आणि शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांची निवड करण्यात आली. या पदावर रणजित चव्हाण पाटील यांची निवड करण्यात आल्याने समितीची पुढील वाटचाल अधिक व्यापक असेल असे मत कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.
शहर समितीच्या एका बैठकीत पुनर्रचनेसाठी नेहमी अग्रेसर असणारे निष्ठावंत कार्यकर्ते मदन बामणे यांच्याकडे सर्वाधिकार देण्यात आले आणि त्याप्रमाणे बामणे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पाचशे कार्यकारिणी सदस्यांची यादी तयार करून १० मार्च रोजी बैठक घेतली, आणि त्याप्रमाणे नूतन कार्यकारिणीची वाटचाल सुरु झाली.
यासाठी रमाकांत कोंडुस्कर व इतरांचे सहकार्य लाभले. पण या बैठकीला मात्र प्रस्थापित “चौकडी” असणारे ज्येष्ठ नेते मात्र अनुपस्थित राहिले. ही खंत बैठकीत अनेक वक्त्यांनी अधोरेखित केली.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा नूतन कार्यकारिणीची बैठक २३ मार्च रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली आणि मधल्या काळात जे समितीत प्रामाणिकपणे कार्य करू इच्छितात, अशा आणखी २५० “कार्यरत” कार्यकत्यांची नावे नव्या कार्यकरिणीत जोडण्यात आली. नेहमी कार्यरत असणाऱ्या, समितीच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून ही संघटना पुढे नेण्याचा मानस अंगी बाळगून नव्या कार्यकारिणीने २३ मार्च रोजी जी बैठक बोलाविली त्यालाही “चौकडी” मधील एकाने खो घालण्याचा प्रयत्न केला व बऱ्याच कार्यकर्त्याना बैठकीपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकारिणी सदस्यांनी हा मनसुबा धुळीला मिळवत नवीन कार्याध्यक्षांची निवड केली.
नव्या कार्याध्यक्षांची निवड होताच कार्यकारिणीतील नेते रमाकांत कोंडुस्कर,संपर्क प्रमुख विकास कलघटगी, महादेव पाटील, दत्ता जाधव, सागर पाटील, यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन समिती व्यापक कशी करता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत. समितीमध्ये सातत्याने सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांसमवेत समिती नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मराठी भाषिकांवर केली जाणारी कन्नड सक्तीची कारवाई तसेच व्यापाऱ्यावर होणारी अरेरावी काही प्रमाणात थांबविण्यात आली. यापुढील काळात विविध व्यापारी संघटनांची भेट घेण्यात येणार असून जर कायद्याप्रमाणेच वागायचे असेल तर उर्वरित 40 टक्के भागात मराठीला स्थान द्या अन्यथा मराठी भाषिक दुकानावर बहिष्कार टाकतील असा निर्वाणीचा इशारा देण्यात येणार आहे.
आजवर सीमाभागातील मराठी भाषिकांवर ज्या ज्यावेळी अन्यायाचे अस्त्र उगारण्यात आले, त्या त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती खंबीरपणे पाठीशी उभं राहून मराठी भाषिकांची बाजू मांडत आली आहे. मध्यंतरीच्या काळात समितीला लागलेले गट-तटाचे ग्रहण आता दूर झाले असून समितीला उभारी देण्याचे कार्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरु झाले आहे. सोशल मीडियावर समितीच्या बळकटीकरणासाठी विशेष मोहीमच कार्यकर्त्यांनी राबविली असून नव्या जम्बो कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली भविष्यात सीमालढ्याला बळ मिळेल आणि समिती मराठी भाषिकांसाठी नवी भरारी घेईल, असा विश्वास आता मराठी भाषिक व्यक्त करू लागले आहेत.