बेळगाव लाईव्ह : कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ई-छावणीद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कर भरल्यानंतर दिली जाणारी ५ टक्के सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत अनधिकृतरित्या पार्किंग केलेली वाहने, कॅम्पमधून सुरू असलेली अवजड वाहतूक यासोबत इतर विकासात्मक चर्चा करण्यात आली. 2021-2024 या काळात नागरिकांना 10 लाख 78 हजार 468 रुपयांची सूट देण्यात आली असून यापुढे ही सवलत बंद केली जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डमधील खुल्या जागा तसेच रस्त्याशेजारी अनधिकृतरित्या वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. काही ठिकाणी वापरात नसलेली वाहने, स्क्रॅप वाहने तसेच क्यावसायिक वाहने उभी केली आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहने पार्किंगसाठी व्यावसायिक वाहनांना कर द्यावा लागणार आहे. एका दिवसासाठी शंभर रुपये तर मासिक 1500 रुपये बोर्डकडे भरावे लागणार आहेत. तसेच स्क्रॅप वाहने पंधरा दिवसात न हलविल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ब्रिगेडियर मुखर्जी यांनी दिला.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये पहिली ते दहावी वर्गात शिकत असलेल्या बीपीएल रेशनकार्डधारक व अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यापुस्तके वितरणासाठी 3 लाख 28 हजार रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. बोर्डने काही दिवसांपूर्वी कंत्राटी कामगारांसाठी निविदा मागविल्या होत्या. एकूण 171 कंपन्यांनी यासाठी बोली लावली होती. यामध्ये वन ग्रुप सोल्युशन यांना कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक जरी पुढे ढकलली तरी मतदारयाद्या तयार करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. अशोक सर्कल ते मार्केट पोलीस स्टेशन, सर्किट हाऊस ते सेठ पेट्रोल पंप, आरटीओ सर्कल ते मार्केट पोलीस स्टेशन, कीर्ती हॉटेल ते त्रिवेणी हॉटेल या दरम्यानच्या रस्त्याचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला होता. हा रस्ता देखभालीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र पाण्याची कमतरता असल्याने पाणीपुरवठ्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना मर्यादितच पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. विनापरवाना कूपनलिकांची खोदाई केल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील उद्यानांचा विकास स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या माध्यमातून केला जाणार आहे. बिकानेर मिठाईवाला तसेच कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य विक्रम पुरोहित यांच्याकडून उद्यानांचा विकास केला जाणार आहे. कोंडाप्पा स्ट्रीट येथील जुन्या विहिरीचे बेळगाव लायन्स क्लबतर्फे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कॅन्टोन्मेंट गेस्टहाऊसजवळ संरक्षक भिंत बांधकामासाठी 9 लाख 60 हजारांचा निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार आहेत. या बैठकीत नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर, उत्तरचे आमदार राजू सेठ, सीईओ राजीव कुमार यांनी सहभाग घेतला होता.
कॅम्पमधून अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्याचा निर्णय
बेळगाव लाईव्ह : गोगटे सर्कल मार्गे शहरात येणारी अवजड वाहने ग्लोब थिएटरमार्गे वळविण्यात येतात. या परिसरात अधिक शाळा असल्याने शालेय विद्यार्थी तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांना कळवूनही त्यांच्याकडून अवजड वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे यापुढे कॅम्पमधून अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला.
अवजड वाहतुकीमुळे मागील वर्षी या भागात अनेक अपघात घडून जीवितहानी झाली आहे. यानंतर स्थानिक रहिवाशांनी आंदोलन छेडल्यामुळे काही दिवस अवजड वाहतूक बंद होती. परंतु, पुन्हा एकदा अवजड वाहतूक सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अवजड वाहनांमुळे अनेक विद्याथ्यर्नां अपघात झाले असून हे प्रकार रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने आता पुढाकार घेतला आहे. ट्रक, लॉरी, डंपर, ट्रॅक्टर यासारखी अवजड वाहतूक करणारी वाहने पोलिसांकडून इंडिपेंडंट रोडमार्गे वळविली जातात. या परिसरात सेंट जोसेफ, सेंट पॉल्स, बेळगाव मिलिटरी स्कूल, केंद्रीय विद्यालय व इतर शाळा असल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची ये-जा सुरू असते. तसेच हा परिसर रहिवासी वसाहत असल्यामुळे अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे.
कॅन्टोन्मेंट कायदा 2006 च्या अन्वये कॅम्प परिसरातील अवजड वाहतुकीवर निर्बंध आणले जाणार आहेत. अवजड वाहतूक इतर मार्गे वळविण्यासंदर्भात रहदारी पोलिसांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. निर्बंध असूनदेखील अवजड वाहतूक सुरूच राहिल्यास अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा सीईओंनी दिला आहे.