बेळगाव लाईव्ह विशेष : ‘अमृताते हि पैजा जिंके’ अशा शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा गायला. मात्र आज याच मराठीवर बहुभाषिक मराठी असणाऱ्या सीमाभागात लाचारीची वेळ आल्याचे चित्र दिसत आहे. मराठीसाठी सर्वस्व पणाला लावणारे सीमावासीय, मराठीसाठी बलिदान देणारे सीमावासीय आज बेळगावमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. आज मराठी आणि मराठी भाषिकांवर हि परिस्थिती का आली? याची अनेक कारणे आहेत. कित्येक मराठी भाषिक या परिस्थितीवर सोशल मीडियावर यावर व्यक्त होताना दिसत आहेत. मात्र बेळगावमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर आता केवळ विचार व्यक्त करण्याची नाही तर ठोस कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सीमाभागात मराठीसाठी आजवर अनेक आंदोलने उभी राहिली. रक्त सांडले. बलिदान दिले. हौतात्म्य पत्करले. परंतु आजच्या घडीला कर्नाटकाच्या जुलुमी कारवायांना ठोस उत्तर देण्यात आपण कमी पडत असल्याचे जाणवत आहे. मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा केवळ राजकारणासाठी वापर करणारे नेतेदेखील आज मूग गिळून गप्प आहेत. निवडणुका जवळ आल्या कि मराठीचे तुणतुणे वाजवणारे नेते निवडणुका होताक्षणीच राष्ट्रीय पक्षांची लाचारी करण्यासाठी सज्ज होतात. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठीचा स्वतःच्या सोयीनुसार वापर करणाऱ्या नेत्यांमुळेच आज बेळगावमधील मराठी भाषिकांवर हे दिवस आले आहेत.
राष्ट्रीय पक्षांची हुजरेगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे आज सीमाभागातील तमाम मराठी भाषिक परखडपणे आपली मते मांडण्यासाठीही कमकुवत ठरत आहेत. प्रत्येक सर्वसामान्य मराठी भाषिकांच्या मनात सीमाभागात होणाऱ्या या कर्नाटकी अन्यायाविरोधात संताप आहे. मात्र सीमावासीयांकडे योग्य आणि खंबीर नेतृत्व नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पुढे येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे.
विधानसभेच्या निवडणुका असोत किंवा लोकसभेच्या.. निवडणुकीत पैशाच्या जोरावर राजकारण करून मराठी भाषिकांना आमिष देऊन भुलविण्यात येते. मुळात मराठी भाषिकांना मूळ मुद्द्यावरून हटवून इतर गोष्टींकडे जाण्यासाठी परावृत्त कारण्यातदेखील नेतेमंडळींचा मोठा सहभाग असतो.
स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या नेतेमंडळींनी सीमावासीयांना दावणीला बांधले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सीमावासीयांची सुरु असलेली झुंज आणि दुसरीकडे ‘आता खातो धन्याचं आणि नाव घेतो गण्याचं’ अशा अविभार्वात असलेले मराठी नेते.. या परिस्थितीमुळे बेळगावमधील मराठी भाषिकांवर हि परिस्थिती ओढवली आहे.
सीमाभागात मराठी रुजवण्यासाठी, टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी एकजुटीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता एकजुटीने रस्त्यावर उतरून विरोध करणे गरजेचे आहे. सीमाभागात मराठी टिकविण्यासाठी आजवर अनेक साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. मात्र साहित्य संमेलनाच्या मंटपातून बाहेर पडल्यानंतर साहित्य संमेलन आपल्या मनात कितपत रुजले? याचे उत्तर प्रत्येक मराठी भाषिकाने स्वतःकडेच मागणे आवश्यक आहे.
स्पर्धेच्या नावावर इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना शिकविणाऱ्या पालकांनी स्वतःच्या मराठीपणावर प्रश्न उपस्थित केला पाहिजे, शिवाय याचे उत्तरही स्वतःकडेच मागितले पाहिजे. उत्सव, यात्रा, जत्रा अशा ठिकाणी मराठीचा केवळ जयघोष करणाऱ्या मराठी भाषिकांनी मराठीच्या अस्तित्वासाठी खऱ्या अर्थाने कसोटी केली पाहिजे. मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी एकांकिका यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांमधून मराठीची गोडी वाढविली पाहिजे. आपण ज्या गोष्टीसाठी नेतेमंडळींना नेतृत्व करण्यासाठी निवडून देतो अशा नेतेमंडळींना जाहीर सवाल केले पाहिजे.
घटनेने दिलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहून लोकप्रतिनिधींना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारून न्याय मिळविण्यासाठी एकजुटीने लढा दिला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपापसातील हेवेदावे बाजूला सारून, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात स्वतःचे मराठीपणाचे अस्तित्व जपण्यासाठी एकसंघ होऊन एकजुटीने एल्गार पुकारणे हि काळाची गरज आहे.