बेळगाव लाईव्ह:खानापूर येथील मलाप्रभा नदीचे पात्र सध्या कोरडे पडल्यामुळे पुलाच्या ठिकाणी पात्रातील गाळ-केरकचरा, टाकाऊ साहित्य उघड्यावर आले असून किमान आता तरी अस्वच्छ नदीपात्राची स्वच्छता केली जावी अशी मागणी होत आहे.
खानापूर येथे मलप्रभा नदीवरील पुलाच्या ठिकाणी कोरड्या पडलेल्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ, केरकचरा, टाकाऊ साहित्य साचल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणच्या नदीपात्रात धार्मिक तसेच अंत्यसंस्काराशी संबंधित विधी केले जातात. त्याचप्रमाणे निर्माल्यही विसर्जित केले जाते.
परिणामी अलीकडच्या काळात येथील पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केरकचरा गाळ व टाकाऊ साहित्य जमा होत आहे. हे सर्व उन्हाळ्यात उघड्यावर पडून अस्वच्छतेचे दर्शन घडत असते.
त्याचप्रमाणे सदर प्रकारामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण होत असतो. दरवर्षी उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीपात्राची साफसफाई केली जावी अशी मागणी केली जात असते.
मात्र अद्यापपर्यंत स्थानिक प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. तेंव्हा किमान यंदा आता तरी नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन कोरड्या पडलेल्या आणि स्वच्छतेस अनुकूल असलेल्या खानापूर येथील मलप्रभा नदीपात्राची साफसफाई करावी, अशी मागणी जागरूक जाणकार नागरिकांकडून केली जात आहे.