बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हटलं की खानापूर डोळ्यासमोर येतं. महाराष्ट्र एकीकरण समितीने कोणा एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी आणि जनतेने त्याला डोक्यावर घेऊन निवडून द्यावे, हे समीकरण होते. पण सध्या बालेकिल्ल्यातील सुरु असलेले समितीचे राजकारण हे मराठी माणसाचे दुर्दैव म्हणावे का? बालेकिल्ल्याचा हा लवाजमा सध्या इतिहासजमा झाला कि काय? असा प्रश्न सध्या सर्वांना पडत आहे. गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहता स्वार्थापलीकडे जाऊन विचार करणाऱ्या आंदोलनासमवेत मराठी भाषिकांना दिशा दर्शविणारे नेतृत्व नसल्यामुळे खानापूर समितीची ही गत झाल्याचे चित्र आहे.
समितीसाठी वरदान लाभलेल्या तालुक्याला बंडखोरीचा शाप तर लागलाच आहे. बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या गटातटाच्या राजकारणात समितीचे विभाजन होऊन समितीचे अस्तित्व संपुष्टात येते कि काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
2018 पासून समितीला लागलेले बंडखोरीचे ग्रहण मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काही नेत्यांच्या स्वार्थी आणि हेकेखोर वृत्तीमुळे समितीमधील गटातटाचे राजकारण संपुष्टात आलेच नाही. खानापूर शिवस्मारकात पार पडलेल्या बैठकीत नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या नियमांना तिलांजली देऊन कागदाच्या चिटोऱ्यावर खानापूर समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. जे नेते आणि कार्यकर्ते मध्यवर्तीच्या प्रवाहात आधीपासून होते, किंबहुना स्थापनेपासून समितीसोबत होते अशा चेहऱ्यांना कार्यकारिणीपासून अलिप्त ठेवून राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहातून पुन्हा समितीत परतलेल्या संधी देण्यात आली.
राष्ट्रीय पक्षांच्या हस्तकांना झुकतं माप देण्यात आल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांचा पुन्हा हिरमोड झाला. याच माध्यमातून खानापूरकरांचा नकार असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली. नाराज गटाने निवडणूक आणि एकंदर प्रचार प्रक्रियेपासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यामुळे खानापूरकरांनी उमेदवारासह समितीलाही भुईसपाट केले. समितीचा बालेकिल्ला म्हणून मिरविणाऱ्या समितीचा खानापुरात नाचक्कीजनक पराभव झाला. आणि या पराभवाची नैतिक जबाबदारी मात्र ना नव्या कार्यकारिणीने घेतली आणि नाही कोणत्या नेत्याने! याउलट या पराभवाचे खापर वेगळ्याच गोष्टीवर फोडण्यात आले, हे वेगळेच!
खानापूर समितीत सुरु असलेला कारभार आलबेल नाही. मात्र जे कार्यकर्ते एकत्रित आले त्या कार्यकर्त्यांची मने आणि मते कधी एकत्रित आली नाहीत आणि यामुळेच खानापूर समितीच्या इतिहासातील सर्वात मोठा जिव्हारी लागेल असा पराभव सामोरे आला. वरवर एकत्रित वाटणाऱ्या समितीची अंतर्गत चार शकले कधी झाली आणि चार कंपू निर्माण होऊन प्रत्येकाचे चेहरे वेगवेगळ्या दिशेने कसे वळाले याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या बैठकीत आला. एका युवा पदाधिकाऱ्याची आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून सध्या हा इच्छुक उमेदवार खजिनदाराच्या गळ्यातला ताईत बनला आहे. सदर इच्छुक उमेदवाराने राष्ट्रवादीचे शरद पवार यांची परस्पर भेट घेत, कोणत्याही ज्येष्ठ नेत्याला विश्वासात न घेता निवडणूक लढवावी अशी बातमी पसरवली असा काहींचा आरोप आहे. निवडणूक कोणी लढवावी, आपला उमेदवार कोण असावा हे जर जनतेने ठरवले आणि जनतेच्या आवडीचा उमेदवार जर निवडणूक रिंगणात उतरला तर याआधीच इच्छुक उमेदवाराने हा आततायीपणा का केला असावा? असा सूरही उमटू लागला आहे.
हि बाजू एकीकडे असताना दुसऱ्या बाजूला आणखी एक गट सध्या काँग्रेसच्या वळचणीला जाण्याच्या तयारीत आहे. मागील काही निवडणुकीत देखील बहुतांशी मराठी मतदार राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाही गेले आहेत, हे जगजाहीर आहे. मात्र आता हा विषय केवळ खानापूर पुरता मर्यादित नसून संपूर्ण कारवार लोकसभा मतदार संघाची देखील अशीच अवस्था आहे. दिल्ली गाठली कि त्याचा परतावाही त्याच पद्धतीने मिळणार या अनुषंगाने समितीकडून निवडणूक लढविण्यासाठीच आता विरोध होत आहे, हि देखील मोठी दुर्दैवाची बाब आहे.
निवडणूक लढवण्यासाठी समर्थन व विरोध यामध्ये बरेचसे गुपित दडलेले आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या आर्थिक देवाणघेवाणीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. वरवर समितीच्या बाजूने असणारे कार्यकर्ते दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून मलिदा घेताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये दोन्ही गट मरगळलेले असताना खानापूर युवा समितीच्या माध्यमातून लोकांना येणाऱ्या समस्या सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला होता. जनतेचा व समितीप्रेमींचा पाठिंबाही त्यांना मिळत होता. पण राष्ट्रीय पक्षांशी अर्थपूर्ण फिक्सिंग असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्याकडून युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अस्तित्वच मान्य केले जात नसल्याचे प्रकार घडले आहेत. समितीमध्ये येऊन कार्य करण्यासाठी अनेक तरुण इच्छुक आहेत. मात्र या तरुणांना संधी दिली जात नसल्याचेही आरोप आहेत.
समिती ही बापाची मालमत्ता समजून घरी कार्यकारिणी निवडणाऱ्यांना जाहीरपणे कार्यकारिणी निवडण्याचे कार्य सुचलेच नाही. गटातटाच्या राजकारणात आजवर समितीने मोठे नुकसान झेलले आहे. अर्थपूर्ण व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रंग बदलणाऱ्या वृत्तीचा प्रत्यय काल झालेल्या खानापूर समितीच्या बैठकीत आलाच आहे. शिवाय याला दुजोरा काही प्रसारमाध्यमांनीही दिला आहे. खानापूर समितीचा हा बालेकिल्ला ढासळण्याच्या मार्गावर असून राष्ट्रीय पक्षांशी साटेलोटे ठेवणाऱ्या या नेत्यांमुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र नेहमीप्रमाणेच संभ्रमावस्थेत पडत आहे, हे नक्की.