बेळगाव लाईव्ह विशेष : भाषावार प्रांतरचनेनंतर अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आलेला ८६५ गावांचा सीमाभाग! कर्नाटकात समाविष्ट झालेल्या या सीमाभागात कन्नडसक्ती, प्रशासकीय जुलूम, मराठी भाषिकांना लक्ष्य ठेवून अस्तित्वात आणले जाणारे कायदे, लोकशाहीचा गळा घोटून लोकशाहीच्या हक्कांपासून मराठी भाषिकांना डावलण्याचा प्रकार, कधी जमिनी संपादन कधी मराठी तरुणांवर खोट्या केसीस, विकासाच्या नावावर मराठी भाषिकांवर लादण्यात येणारे बेकायदेशीर नियम, अटी या सर्व गोष्टी एखाद्या चित्रपटात मांडण्यासारख्या आहेत, परंतु हि हृदयद्रावक सत्य आणि सद्य:परिस्थिती बेळगावची आहे.
हि शोकांतिका मनात घेऊन कर्नाटकात खितपत पडलेल्या मराठी भाषिकांच्या मनावर आता मरगळ पडली आहे. कर्नाटकचे सातत्याने होणारे अन्याय आणि अत्याचार या गोष्टी मराठी माणसाच्या अंगवळणी पडल्या आहेत. मात्र हि मरगळ मराठी भाषिकांनी वेळीच झटकली नाही तर मराठीची नाळ असलेल्या मुंबईची जी अवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे तीच वेळ बेळगाववर येणार यात तिळमात्र शंका नाही.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकारण्यांचा कोणताही धर्म, जात, भाषा नसते असं म्हटलं जातं. राजकारण्यांना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या होकारात होकार मिसळावा लागतो, विविध प्रलोभने द्यावी लागतात, आपले इप्सित साध्य करण्यासाठी, सत्ता आणि पद मिळविण्यासाठी राजकारणी मंडळी निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक मतदाराच्या समोर लोटांगण देखील घालतात.
परंतु सीमाभागातील राजकारण मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून सत्ता आणि पदापुरते मर्यादित नाही. बेळगाव हे प्रत्येक मराठी भाषिकांची स्वाभिमान आणि अभिमानाची बाब आहे. मराठमोळ्या बेळगावची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. इथली संस्कृती, इथली माणसं गेल्या ६७ वर्षांपासून केवळ मराठीच्या अस्तित्वासाठी निकराची झुंज देत आहे. मराठी माणसाची हीच ताकद ओळखून कर्नाटकातील राजकीय पक्षांनी ‘डिव्हाइड अँड रुल’ धोरण आखले. याला काही मराठी नेतेमंडळी, कार्यकर्ते बळी पडले. मात्र दिवसागणिक यामागचे राजकारण मराठी भाषिकांच्या लक्षात येऊ लागले.
मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी भाषिक यांना बेळगावमधून हद्दपार करण्याचा कुटील डाव आखणाऱ्या कर्नाटकाला मराठी भाषिकांच्या ताकदीचा चांगलाच अंदाज आहे. मराठमोळ्या बेळगावची ओळख पुसण्याचे काम सातत्याने कर्नाटकात होत आहे. यासाठीच बेळगावमध्ये बुडा अंतर्गत २८ गावांची जमीन संपादित करून विकासकामांचा घाट घालण्यात आला आहे. सुवर्णसौध असो किंवा बेळगावमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आलेले प्रकल्प असोत. सध्या रिंगरोडचा घाट घालून बहुतांशी मराठी भाषिकांच्या जमिनी असलेल्या भागात प्रकल्प उभारण्यात येत आहे. बायपासदेखील यातीलच एक प्रकार.
अलीकडेच संमत झालेला कन्नडसक्तीचा कायदा आणि याअंतर्गत सीमाभागात जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना करण्यात आलेलं लक्ष्य. नियम आणि कायद्याच्या नावावर दररोज फाडले जाणारे फलक मराठी माणसाच्या काळजावर ओरखडे पाडत आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयात कानडीकरणाचा सपाटा सुरु आहे. शासकीय कार्यालयात मराठीत संभाषण केल्यास काश्मीरमधील आतंकवाद्याप्रमाणे वागणूक दिली जातं आहे. मराठी भाषिकांचा अशा पद्धतीने होणारा अपमान हा पर्यायाने मराठी भाषा आणि संस्कृतीचाही आहे.
रिंग रोड, बायपास मध्ये बहुतांशी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनी या मराठी माणसाच्या असून या सर्व गोष्टींमुळे मराठी माणूस उद्ध्वस्त होत चालला आहे. ज्याठिकाणी मराठी माणसाचा राजवाडा होता तिथं मराठी माणसाची झोपडीही शिल्लक राहाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याठिकाणी मराठी माणसाच्या जमिनी होत्या, त्याठिकाणी विकासाच्या नावावर वस्त्या बसविण्यात आल्या. रस्ते करण्यात आले. मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने कस पणाला लावला. बहुतांशी मराठी भाषिक जनता शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतजमिनी हडपून विविध योजना राबविण्याचे षडयंत्र आखले गेले. मात्र मराठी भाषिक जमिनी विकून किंवा जमिनी संपादित करून संपणारा नाही, हे आपल्याला दाखवून देण्याची वेळ आली आहे.
सीमाभागाचे मराठीपण, सीमाभागातील मराठी संस्कृती आणि सीमाभागातील मराठी माणूस किती खंबीर आहे, स्वाभिमानी आहे, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांचे महत्व आणि अस्तित्व अधोरेखित करणे हे प्रत्येक मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे. या निवडणुकीत जर मराठी भाषिकांनी आपला मराठी बाणा आणि कणा आपल्या मतांच्या माध्यमातून दर्शवला नाही तर भविष्यात कर्नाटकाच्या हिटलरशाहीला बळी पडून आपली मराठी भाषा, संस्कृती आणि आपला मराठी स्वाभिमान हा केवळ कागदाच्या बासनात गुंडाळून ठेवण्यापुरता मर्यादित राहील, अशी सोय कर्नाटकाने करून ठेवली आहे. आगामी लोकसभा निवडणूक हि राजकीय दृष्टिकोनातून न घेता आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या घटनात्मक हक्कांसाठी आणि प्रामुख्याने आपल्या मातृभाषेसाठी लढणे हे अत्यंत गरजेचे आहे.
क्रमशः