बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील जागृत आणि पवित्र धार्मिक स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र दक्षिण काशी, कपिलेश्वर देवस्थानात शुक्रवार दि. ८ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. ७ मार्च रोजी रात्रीपासून शुक्रवार दि. ८ मार्च रोजी रात्रीपर्यंत महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच यावर्षी शीशमहलचा देखावा मंदिरामध्ये साकारला जाणार आहे. त्यामुळे बेळगावकरांसाठी ही एक पर्वणी ठरणार असून कपिलेश्वर मंदिराकडून अनेक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
गुरुवारी रात्री 12 वाजता कपिलेश्वर महादेव ट्रस्टतर्फे पूजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक भाविकांसाठी सुरू राहील. सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत विशेष रुद्राभिषेक केला जाणार आहे. याचबरोबर त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
पालखी प्रदक्षिणेनंतर महाआरती करण्यात येणार आहे. दरवर्षी भाविकांची होणारी गर्दी पाहता चोख नियोजन करण्यात आले आहे. बेळगावचे कलाकार विनायक पालकर यांच्या संकल्पनेतून शिशमहलचा देखावा साकारण्यात आला आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावर्षी मच्छे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्राच्या मुलांकडून चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात येणार आहे.
याबरोबरच भाविकांना वैद्यकीय सेवा, लहान मुलांसाठी हिरकणी कक्ष (स्तनपानासाठी), रुग्णवाहिका सेवा, कपिलेश्वर तलावावर उपवासाची खाऊ गल्ली सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच फळे, फुले, कपडे, अगरबत्ती, धार्मिक स्टॉल, धार्मिक ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
दरवर्षी हजारो भाविक कपिलेश्वराच्या दर्शनाला येत असतात. भाविकांना आपल्या कुटुंबीयांसाठी प्रसाद घेऊन जाता यावे, यासाठी तिरुपती मंदिराच्या धर्तीवर सशुल्क लाडू विक्री केली जाणार आहे. याबरोबरच न्यू गुड्सशेड रोड व धर्मवीर छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कपिलेश्वर मंदिरच्या युट्यूब व फेसबुक पेजवरून शिवरात्री सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाविकांना पाहता येईल.
शनिवार दि. 9 रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. यावर्षी 50 हजार भाविक महाप्रसाद घेतील, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कपिलेश्वर महादेव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलत साळुंखे, सेक्रेटरी राजू भातकांडे, सहसेक्रेटरी अभिजित चव्हाण, सुनील बाळेकुंद्री, राहुल कुरणे, अजित जाधव, विवेक पाटील यांनी केले आहे.