बेळगाव लाईव्ह: बेळगाव मराठी पाट्या हटवून सीमा भागातील मराठी लोकांना जाणीवपूर्वक तडीपार करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्र सरकारने तातडीने याविषयी कर्नाटक सरकारला पत्र पाठवावे, असे सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील हे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभियंता सेल प्रमुख अमित देसाई यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, गेल्या 66 वर्षापासून सीमा भागातील मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे. पण कर्नाटकाकडून मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय करण्यात येत आहे. आता तर शहरातील मराठी पाट्या काढून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.
मराठी भाषिकांना सीमा भागातून हद्दपार करण्याचा हा प्रयत्न असून ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने गंभीरपणे कर्नाटक सरकारला पत्र लिहून सूचना गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सीमा प्रश्न बाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जबाबदार मंत्र्यांनी या समितीची सातत्याने बैठक व्हावी यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक होते. खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्र सरकारने या समिती बाबत आग्रही असावे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेलचे प्रमुख अमित देसाई महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते चंद्रकांत कोंडुसकर, बळवंत शिंदोळकर,विक्रम पाटील, रोहन जाधव, विक्रांत होनगेकर किरण हुद्दार आदी उपस्थित होते.